गेली २-३ वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती … माझेच मित्र मला हिंदू द्रोही नजरेने बघू लागले
आपले सण समारंभ साजरे करण्यासाठी मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. भजन, कीर्तन केली जातात अशा वेळी त्या आवाजाचा त्रास वृद्धांनाच नाही तर लहान लहान मुलांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. भोंगा या चित्रपटातून दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील याचे सुंदर उदाहरण प्रेक्षकांच्या समोर आणले होते. केवळ हिंदू सणांमुळेच नाही तर मशिदीत लावलेल्या भोंग्याच्या आवाजामुळे चित्रपटातील त्या छोट्याशा मुलाला झोप नीट लागत नसे. या आवाजामुळे त्याच्या स्वास्थ्यावर काय वाईट परिणाम झाले याचे चित्रण त्यात दाखवण्यात आले होते. पण अशा गोष्टीचक समाजावर प्रभाव पडतो की नाही यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. खरं तर या गोष्टी गांभीर्याने विचारात घेणे गरजेचे आहे. नेमका हाच मुद्दा घेऊन अभिनेते विद्याधर जोशी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या मतांमुळे त्यांना हिंदुधर्म द्रोही असेच म्हटले गेले.पण या पोस्टद्वारे त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे.
बाप्पा म्हणजेच विद्याधर जोशी म्हणतात की, “गेली दोन-तीन वर्ष तुमच्या बरोबर एक गोष्ट शेअर करायची होती ती आज दत्त जयंतीच्या निमित्ताने करतो… मी राहतो त्याच्या पलीकडे दोन गल्ल्या सोडून एका ठिकाणी दरवर्षी 26जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, शिवजयंती (वर्षातून दोनदा),दत्त जयंती, हनुमान जयंती, कृष्णजन्म, राम जन्म (हा अलीकडे जोरात) आणि इतरही काही दिवशी सत्यनारायणाची महापूजा होते. लाऊड स्पीकर वरून मुलायम आवाजात मोठ्यांनी पूजा सांगितली जाते. त्याचा मला पूर्वीपासून त्रास व्हायचा. तो मी बोलूनही दाखवायचो..पण गेली काही वर्ष तो बोलून दाखवला तर माझे मित्र माझ्याकडे हिंदू धर्मद्रोही आणि पर्यायाने इतर प्रकारचा द्रोही ह्या नजरेने बघायला लागले आणि आधी ‘ह्याच्यासारख्यांना कापलं पाहिजे’ असं काहीसं म्हणायला लागले !! मी काय आयडिया केली गेली दोन-तीन वर्ष मी याच दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायला लागलो.सार्वजनिक पूजेच्या तिकडचा भट (किंवा भटजी, गुरुजी) याच्या पूजा सांगण्यावरूनच मी माझ्या घरी पूजा करायला लागलो!! मुलाला ते पूजा सांगणारे कधी येतायेत याच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते आले की तो मला लगेच फोन करतो.. मी लगेच बसतो आणि पूजा त्यांच्या क्लाऊड स्पीकर वरून येणाऱ्या सूचना बहुकूम पूजा करून घेतो !!
हल्ली माझ्याबद्दलचा आदर समाजात वाढलेला दिसतो. ह्यावर्षी मला चौथीपर्यंतच्या मुलांच्या घेतलेल्या स्पर्धांचा बक्षिस वितरक म्हणून बोलावंल आहे. (वाचलेले दक्षिणेचे पैसे साठवून निदान पूजा सगणाऱ्यांकरता योग्य प्रकारे आरत्या म्हणण्याचे आणि लाऊड स्पीकर चालवणाऱ्यांकरता साऊंड इंजिनिअरिंगचे वर्ग सुरू करावेत असं मनात आहे त्याची एक शाखा मशिदीतल्या लाऊड स्पीकरवाल्यां करता ही पुढे मागे चालू करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी देणगी देण्यास हरकत नाही.फक्त ती रुपये पाच हजार आणि त्याच्या पटीत असावी)”. विद्याधर जोशी यांच्या या मतावर अनेकांनी परखडपणे मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या कर्कश्य आवाजाचा त्रास हा लहानांपासून सगळ्यांनाच होत असतो. त्यावर आता बंधनं यायला हवीत. सण समारंभ, धार्मिक कार्य, कीर्तन, भजन, मस्जिद, ख्रिसमस पार्टी अशा वेळी आयोजकांनीही सहकार्य करायला हवं. सण समारंभ हे मोठ्याने आवाज केल्यानेच साजरे होतात असे नाही. तेव्हा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊनच योग्य ते प्रयत्न केले जावेत असेच मत यावर अनेकांनी सुचवले आहे.