सकाळी ७ वाजता मतदान केंद्रावर गेलो ३ तास शोधाशोध करूनही… सावळ्या गोंधळामुळे सुयशला इच्छा असूनही मतदान करता आलं नाही
सगळीकडे निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. आज पुण्यात देखील काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. दुपारपर्यंत बऱ्याच मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बाजावलेला आहे. त्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी जमलेली पाहायला मिळाली. मतदान करा , तो आपला हक्क आहे आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या असे बोलले जाते. पण मतदान केंद्रावरच सावळा गोंधळ पाहायला मिळतो आहे. सुयश टिळक हा पुण्याचा. आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तो सकाळीच मतदान केंद्रावर हजर झाला होता. पण नावातील गोंधळ आणि आता चक्क यादीत नावच सापडत नसल्याने त्याला हा हक्क बजावता आलेला नाही अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. स्थानिक उमेदवारांची भेट घेऊनही आपलं मतदार यादीत नाव सापडत नसल्याने सुयश टिळकला नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
मतदार यादीत नाव सापडत नाही, मतदार केंद्र बदलले असावे म्हणून सुयश टिळकने ते शोधण्यासाठी सकाळपासूनच मोठे प्रयत्न केले होते. पण त्याच्या हाती निराशाच आलेली पाहायला मिळाली. यबद्दल सविस्तर माहिती देताना सुयश म्हणतो की, “गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. ह्यावेळी सुदैवाने ऑनलाइन पोर्टल वर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना( त्यात तीच चूक होतीच). वोटिंग बुथला सकाळी सात वाजता पोहोचलो माझ्या ऑनलाइन पोर्टल वरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बुथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते कळले म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली शोधाशोध केली.
गेली अनेक वर्षे मी मतदान न चुकता करत आलो आहे. ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही ह्याची खंत वाटते, वाटत राहील.” दरम्यान असे प्रसंग अनेक मतदारांनी अनुभवले असतील. मतदार केंद्रावरचा सावळा गोंधळ हा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांची मात्र घोर निराशा करताना दिसतो. त्याचमुळे सुयशला इच्छा असूनही आज मतदान करता आले नाही ही खंत त्याने व्यक्त केली आहे.