असंभव, पुढचं पाऊल आणि नंतर अग्निहोत्र अशा मलिकांमुळे अभिनेता आस्ताद काळे हा प्रसिद्धीच्या झोतात आला. मराठी बिग बॉसच्या घरात त्याने आपली मतं परखडपणे मांडणारा कलाकार म्हणून स्वतःची एक वेगळी इमेज बनवली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतही त्याने अशीच परखड मतं मांडली आहेत. त्याची ही मुलाखत याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पूर्वीच्या कलाकारांना म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यासारख्या कलाकारांना प्रेक्षकांशी जवळून संवाद साधता येत नसायचा. त्यांच्यात ही खंत होती. पण मध्यंतरी सचिन पिळगावकर यांनी एक गाणं आणलं त्यामुळे ते सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले.
तेव्हा ते मला म्हणाले होते की, नाहिरे ते पूर्वीचच होतं ते बरं होतं. कारण ह्यांच्यावर धरबंध राहत नाहीत. फार पटकन ते अडनावावर जातात. फार पटकन घरच्यांवर, आई वडिलांवर बोलतात ह्याची गरजच नाहीये, असं मत त्याने या ट्रोलिंगवर मांडल आहे. आस्ताद काळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करताना दिसला. पण माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी सभ्य भाषेतच माझं मत मांडत असतो आणि मला माझी मतं मांडण्याचा अधिकार आहे असे तो प्रामाणिकपणे सांगतो. फक्त एका पोस्टमध्ये मी शिवी दिली होती तेव्हा लोकांनीच मला माझी चूक दाखवून दिली, त्यानंतर मी कधीच चुकीचं पोस्ट केलं नाही असे तो सांगतो.
काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकर याच्या मुलाच्या नावावरून त्याला, त्याच्या कुटुंबियांना ट्रोल करण्यात आलं होतं. जहांगीर हे नाव पारशी असूनही कित्येकदा त्याचे स्पष्टीकरण देऊनही हे नाव मुस्लिम असल्याचं म्हटलं गेलं. याबद्दल आस्तादनेही त्याच्या नावाबद्दल एक मत मांडलं आहे. आस्ताद हे नाव मराठी नाही हे नाव वेगळं आहे याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणतो की, नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान वगैरे होऊन गेला नाहीये त्यामुळे माझे वडील यातून वाचले. मनोज नावाचे क्रिमिनल होऊन गेले राजन नावाचे क्रिमिनल होऊन गेले पण नावात काहीही नसतं, तुम्ही घरात काय संस्कार करता त्यावर हे अवलंबून असतं, असे तो म्हणतो.