दिल्ली एनसीआरमध्ये रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष विकणारा एक ग्रुप चालवल्याप्रकरणी गौतम बुद्ध नगर पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव याचेही नाव घेण्यात आले आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिचा नवरा परदिप खरेरा याचेही नाव या आरोपींमध्ये गोवण्यात आले आहे.सध्या मानसी नाईक आणि परदिप खरेरा हे दोघेही घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार नोएडाच्या सेक्टर ५१ मधील शेवरॉन बँक्वेट हॉलमधून ही अटक करण्यात आली. पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था आणि लोकसभा भाजप खासदार मनेका गांधी यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अरोपींवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल, तीतुनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी नावे जाहीर करण्यात आली आहेत. हे सगळे आरोपी दिल्लीतील बदरपूर येथील मोलारबंद गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडून २० मिली सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर, २ दोन डोक्याचे साप आणि एक उंदीर असे प्राणी जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी एल्विश यादव आणि परदिप खरेरा यांनी या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला आहे. एक व्हिडिओ शेअर करत परदिप आणि एलविश यांनी या प्रकरणाची स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ” माझ्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत… आणि खोटे आहेत… मी यूपी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे… मी पोलीस प्रशासन आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की जर त्यांना यात माझा ०.१% सहभाग आढळला तरी मी सर्व आरोप स्वीकारण्यास तयार आहे…” तर परदिप खरेरा याचे म्हणणे आहे की, ” ही सर्व बातमी व्हायरल होत आहे ती सर्व खोटी आहे.सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आम्हाला चुकीच्या पध्दतीने यात अडकवण्यात येत आहे. अशा व्हायरल न्यूजमध्ये मी सुद्धा दिसतो आहे.
त्यामुळे लोक मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला देखील फोन करून प्रश्न विचारून चौकशी करू लागले आहेत.तुम्हाला मी सांगतो की ही सगळी चुकीची माहिती आहे. माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाहीये. माझा या तस्करीशी काहीही संबंध नाहीये.एलविशने पण असं काहीही केलेलं नाही. आम्ही ३२ पोर या एका गाण्याच्या शूटसाठी तिथे सगळे जमलो होतो. फझील पुरीया याने हे गाणं तयार केलं होतं पण हे गाणं आम्ही सहा महिन्यांपूर्वी शूट केलं होतं. तिथे तस्करी सारखा कुठलाही प्रकार घडला नव्हता. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका”. असे परदिप खरेराचे म्हणणे आहे. दरम्यान परदिप खरेरा याने एलविश यादव सोबत सापासोबत खेळतानाचा तो व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ जुना आहे आणि आम्ही गाण्याच्या शुटिंगनिमित्त एकत्र भेटलो होतो असे स्पष्टीकरण तो देत आहे.