मन उडू उडू झालं मालिकेतील सत्तूच झालं लग्न… अनेक कलाकारांनी हजेरी लावत दिल्या शुभेच्छा फोटो होत आहेत व्हायरल
झी मराठीवरील मन उडू उडू झालं मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या मालिकेतील सत्तूची भूमिकाही विशेष लोकप्रिय झाली होती. ही भूमिका अभिनेता विनम्र भाबळ याने साकारली होती. विनम्र भाबल हा विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. नुकताच तो विवाहबंधनात अडकल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ८ डिसेंबर २०२३ रोजी विनम्र भाबळचा पूजा हळदणकर सोबत मोठया थाटात विवाहसोहळा थाटात पार पडला. त्याच्या लग्नाला मन उडू उडू झालं मालिकेतील कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. पौर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब, अंकुश मारोडे, रुपलक्ष्मी शिंदे, हृता दुर्गुळे यांनी विनम्रला आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विनम्र भाबळ हा गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहे. अभिनयाच्या जोडीला त्याला वाचनाची भयंकर आवडआहे. सोशल मीडियावर तो वाचन वेडा या नावाने त्याचे फेसबुक ग्रुप चालवतो. विनम्र भाबळ हा मूळचा देवगडचा. मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेत असताना त्याने रंगभूमीवर एकांकिकामधून काम करण्यास सुरुवात केली होती. डेंगो या मालवणी नाटकात त्याने छोटीशी भूमिका केली होती. परंतु पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात किमान छोटी तरी भूमिका मिळावी अशी ईच्छा असतानाच चित्रगंधा या नाटकाने त्याची ही इच्छा पूर्ण केली. एकांकिकेतून काम करत असल्याने मंदार देवस्थळी एका स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम करत होते. त्यांनीच विनम्रला कुठलीही ऑडिशन न घेता माझे पती सौभाग्यवती या मालिकेत मोठी भूमिका देऊ केली होती.
या मालिकेमुळे विनम्रला अमाप लोकप्रियता मिळाली. फुलपाखरू, मोरूची मावशी, स्वीटी सातारकर, रेडू, ये रे येरे पैसा अशा मालिका, नाटक आणि चित्रपटातून विनम्रने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो राजू बनगया जेंटलमेन या नाटकातून सहाय्यक भूमिकेत दिसत आहे. याचदरम्यान त्याने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडून तिच्याशी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. विनम्रला आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.