होय हे आमचं घर आहे… महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे घर घेणं शक्य झालं श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक नवीन कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. जुने आणि प्रसिद्धी मिळालेले कलाकार काही कारणास्तव शो सोडून गेले असले तरी आजही महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. असाच एक नवखा कलाकार रोहित माने याला देखील शो मध्ये झळकण्याची संधी मिळाली. आज मी जे काही आहे ते ह्या हास्यजत्रेमुळेच आहे हे तो छाती ठोकून सांगताना पाहायला मिळतो. रोहित माने याने आपल्या आयुष्यातील एक सुंदर स्वप्न सत्यात उतरवलं असल्याचं सांगितलं आहे. आपल्या पत्नीसोबत त्याने त्यांच्या स्वतःच घर खरेदी केल्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आजवरच्या प्रवासात त्याच्या पत्नीने देखील त्याला मोलाची साथ दिली असल्याचं तो म्हणतो, नुकताच त्याने आपल्या नव्या घराचं व्हिडिओ देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे त्यात तो म्हणतो “मी साताऱ्यात जन्माला आलो. तिथेच वाढलो. माझे वडील कामानिमीत्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी. कुटुंबापासून किती दिवस लांब रहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं. लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहीलो, काही घरं आवडत नसतानाही नाईलाज म्हणून रहावं लागलं आणि काही घर खूप आवडत असतानाही नाईलाज म्हणून सोडावी लागली. त्या सगळया प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता येईल. बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही.
पण श्रदधा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिंमतीने तू सगळं हातात घेतलंस त्यामुळे आणि त्यामुळेच हे शक्य झालंय. ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने दिली. आता मी हक्काने सांगू शकतो… होय हे आमचं घर आहे. स्वप्नपूर्तीचा हाच तो अनुभव. ह्या सगळयात माझे आई वडील, माझे सासू सासरे, हयांनी कायमचं आम्हाला दिलेली साथ मी कधीच विसरु शकणार नाही. तुम्हा सगळ्यांचे आर्शिवाद आणि शुभेच्छा कायम आमच्या सोबत असू दया. कायम असंच प्रेम करत रहा. या प्रवासात सोबत असणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत. एका स्वप्नाचा प्रवास पुर्ण होतोय पुढच्या स्वप्नांकडे जाण्याचा ध्यास ठेवून..