तिचं लग्न झालं आणि त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो….देवमाणूस फेम किरण गायकवाडचं ठरलं होतं लग्न पण
लागीरं झालं जी, देवमाणूस, चौक या मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला किरण गायकवाड त्याच्या रिअल लाईफ स्ट्रगलबद्दल पहिल्यांदाच खुलासा करताना दिसला. घरची आर्थिक परिस्थिती, इंडस्ट्रीत येण्यासाठीचा स्ट्रगल, ठरलेलं लग्न मोडल्याने आलेलं डिप्रेशन, त्यातून स्वतःला सावरणं यासगळ्या गोष्टीचा उलगडा त्याने इथे केला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. किरण गायकवाडचे आई वडील गावाहून कामासाठी पुण्याला आले. वडील वॉचमनची नोकरी करायचे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. आईवडील अशिक्षित त्यामुळे किरणचा जन्म कधी झाला याची त्यांनी नोंद केली नव्हती. पण शाळेच्या दाखल्यानुसार १२ जूनला तो त्याचा वाढदिवस साजरा करतो. गणपतीच्या उत्सवात नाटकं बसवणं, त्यात काम करणं असं त्याचं चालू असायचं. पण घरच्या परिस्थितीमुळे ८ वी इयत्तेत असताना त्याने शाळा सोडली आणि शाळेबाहेरच पेरू विकू लागला.
भिंत पेंट करायची कामं करू लागला. पण आईच्या इच्छेखातर तो पुन्हा शाळा शिकू लागला. कॉलेजमध्ये असताना मात्र मित्रांबरोबर फिरणं, माजमस्ती करणं यातच वेळ जाऊ लागल्याने अभ्यासात मन रमेना. दरम्यान आयटी इंजिनीअर झाल्यानंतर किरणने नोकरी केली. त्याचदरम्यान तो नाटकांचे लेखन, दिग्दर्शन करू लागला. यातूनच शिवानी बावकर, निखिल चव्हाण यांच्याशी ओळख झाली. शिवानी बावकरने किरणचा फोटो तेजपाल वाघला दिला होता. पण तेजपालने त्याचा फोटो पाहूनच रिजेक्ट केले होते. पण काही दिवसांनी निखिल चव्हाणच्या इच्छेखातर तेजपालला एक ओडिशनचा व्हिडीओ पाठवला. तेव्हा तेजपालने त्याचे कौतुक केले आणि लागीरं झालं जी मालिकेतील भय्यासाहेबच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली. पुढे देवमाणूस मालिकेतून तो पुन्हा विरोधी भूमिकेत दिसला. पण या मालिकेमुळे लोक त्याला शिव्या देऊ लागले. त्यावेळी आई खूप रडली होती तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं असं तो म्हणतो. त्यामुळे एखादी चांगली भूमिका करेन तेव्हाच आईला सेटवर घेऊन जायचं अशी त्याची इच्छा आहे. मालिका, चित्रपट असा किरणचा प्रवास सुरु आहे. दोन वर्षापूर्वीच त्याने पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला.
चौक चित्रपटात काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं. त्या मुलीसोबत संसाराची तो स्वप्न पाहू लागला. असं घर असावं, इथे नवरा बायकोची फ्रेम असावी अशी स्वप्न तो रंगवू लागला होता. पाच महिन्यात तो त्या मुलीसोबत फक्त दोन ते तीन वेळाच भेटला. पण एक दिवस त्याला मेसेज आला की, तिचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम आहे. त्यानंतर किरण खूप डिप्रेशनमध्ये गेला. त्या मुलीचं लग्नही झालं. त्यामुळे सतत विचाराने तो खचून जाऊ लागला. पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला. तिचं लग्न झालंय हे लक्षात घेऊन त्याने मूव्ह ऑन करण्याचा निश्चय केला. किरणला आता त्याच्या कामातच गुंतून राहायला आवडतंय. लवकरच तो नवनवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भविष्यात लेखक, अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळावं अशी त्याची मनापासून इच्छा आहे, त्याची ही ईच्छा लवकरच पूर्णत्वास येवो हीच सदिच्छा.