येत्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटींची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. त्यात वर्षाच्या सुरुवातीलाच गायिका कार्तिकी गायकवाड हिचा भाऊ कौस्तुभ गायकवाडने मोठ्या थाटात साखरपुडा केला आहे. कौस्तुभ गायकवाड हाही बहीण कार्तिकी प्रमाणेच गायक आहे. दोघेही भावंडं लहान आल्यापासूनच विविध कार्यक्रमात गायनाची कला सादर करायचे. विशेष म्हणजे हे दोघे आळंदीतच लहानाचे मोठे झाले त्यामुळे भक्ती गीतांमध्ये या दोघांनाही विशेष आवड आहे. विविध कीर्तन भजन सोहळ्यात दोघांच्या गाण्यांना लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
खरं तर संगीताचे हे बाळकडू त्यांना वडील कल्याणजी गायकवाड यांच्याकडून मिळाले आहे. कल्याणजी गायकवाड यांना संगीताची आवड असून तबला, हार्मोनियम सारखी वाद्य शिकवण्याचे ते प्रशिक्षण देतात. त्यामुळे त्यांनी कार्तिकी आणि कौस्तुभ या दोघा मुलांवर संगीताचे धडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. यातूनच कार्तिकीने सारेगमप मध्ये विजयाचे स्थान पटकावले. तर कौस्तुभनेही गौरव महाराष्ट्राचा शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग दर्शवला होता. २०१२ मध्ये तो या शोचा विजेता ठरला होता. एवढंच नाही कौस्तुभने स्वतःची KKG या नावाने निर्मिती संस्था उभारली आहे. गायक म्हणून कौस्तुभने आम्ही लग्नाळू या गाण्याला साथ दिली आहे.
नुकतेच कौस्तुभने दीपाली शेडगे सोबत साखरपुडा करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीपाली शेडगे ही काव्या नावानेही ओळखली जाते. लग्नाच्या आधीपासूनच नणंदबाई म्हणजेच कार्तिकीसोबत तिची छान मैत्री जुळली आहे. त्यामुळे आता कौस्तुभ आणि दीपालीच्या लग्नात नणंदबाईचा स्वॅग कसा असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.