सुप्रसिद्ध कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नीचे दुःखद निधन… पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पत्नी विद्याताई अभिषेकी यांचे आज सकाळीच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचार चालू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी मेखला, जावई योगेश खाडीकर, मुलगा पं. शौनक अभिषेकी , सून रश्मी अभिषेकी, अभेद आणि सांजली अशी नातवंड आहेत. कै. पं. जितेंद्र अभिषेकी हे लता मंगेशकर यांचे भाऊ लागतात. विद्याताई अभिषेकी या ८३ वर्षांच्या होत्या. आज सकाळीच पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विद्याताई या मूळच्या बीडच्या.
त्यांचे वडील चंद्रकांत गोडसे महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर असल्याने त्यांची सतत बदली होत असे. १९६९ साली पं जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याशी त्यांनी २९ वर्षांचा संसार केला. ७ नोव्हेंबर १९९८ मध्ये पं जितेंद्र अभिषेकी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. चित्रपट गीतं, संगीत नाटक अशा माध्यमातून त्यांनी गायक संगीतकार म्हणून काम केलं होतं. महेश काळे, शुभा मुदगल, आशा खाडीलकर, देवकी पंडित हे त्यांचे शिष्य होत. जितेंद्र अभिषेकी यांच्या पश्चात पत्नी विद्याताई अभिषेकी यांनी त्यांच्या गुरुकुलची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विद्याताई अभिषेकी यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.