चला हवा येऊ द्या नंतर निलेश साबळे आणि त्यांची टीम आता कलर्स मराठी वाहिनीच्या ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २७ एप्रिल पासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रसारित होत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. ज्यात ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदी अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. यावेळी भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी साडी नेसून स्त्री पात्र रंगवण्याचा प्रयत्न केला. पण ‘पुन्हा तेच’ पाहायला मिळतंय म्हणून प्रेक्षकांनी या शोवर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. चला हवा येऊ द्या या शोमध्येही प्रेक्षकांचे अशाच पद्धतीने मनोरंजन करण्यात आले होते.
तेव्हाही निलेश साबळेने त्यातील सर्वच कलाकारांना साड्या नेसवून स्कीट्सचे सादरीकरण केले. पण आताही तेच तेच पाहायला मिळाले तर या शोचे नाविन्य काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे असे चेहरे चला हवा येऊ द्या मध्ये पहायला मिळाले. या सर्वांनी अनेकदा स्त्री पात्र रंगवून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. हसताय ना हसायलाच पाहिजे या शोची घोषणा झाली तेव्हा प्रेक्षकांनी काहितरी नवीन पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली. पण या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांची निराशा केली. आता कुशल बद्रिकेच्या अनुपस्थितीत ओंकार भोजने कडून नवीन काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण निलेश साबळेने आता त्याला साडी नेसवून पुन्हा चला हवा येऊ द्या ची आठवण करून दिली.
ओंकार भोजने हा एक गुणी कलाकार आहे त्याच्या कलागुणांना हास्यजत्रामध्ये वाव मिळत होता. तिथे त्याची लोकप्रियता मोठी होती. पण ओंकारने जसा हा शो सोडला तसा तो त्याची कला सादर करताना कुठेतरी कमी पडल्याचे जाणवला. निलेश साबळेने ओंकारच्या कलागुणांना वाव द्यायला हवा. साडी नेसून विनोद घडवण्यापेक्षाही साधं काहितरी दाखवून लोकांना हसवता येतं हे त्याने वेळीच ओळखायला हवं. नाहीतर जर चला हवा येऊ द्या सारखा हा शो झाला तर प्रेक्षक नक्कीच त्याकडे पाठ फिरवतील.