ना धों ताम्हणकर यांच्या गोट्या या कादंबरीवर आधारित ‘गोट्या’ ही मालिका ९० च्या दशक९० च्या दशकात दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होत होती. या मालिकेत जॉय घाणेकर गोट्याच्या प्रमुख भूमिकेत दिसला होता . भय्या उपासनी, मानसी मागिकर, सुहास भालेकर, सविता मालपेकर, प्राची साठे, संपदा जोशी असे बरेचसे कलाकार मंडळी महत्वाची भूमिका साकारताना त्यात दिसले होते. या मालिकेची खासियत अशी होती की ही मालिका १३ च्या पटीत वाढवून मिळत होती. २६ भाग झाल्यावर ही मालिका लोकप्रियता मिळवत असल्याचे पाहून ३९ भागापर्यंत वाढवून मिळाली होती. मात्र ३३ व्या एपिसोडला मालिकेचे दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘आता आणखी पाणी घालणं शक्य नाही’ असे स्पष्ट केले होते. मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला बालकलाकर आज काय करतो याची उत्सुकता अनेकांना आहे आज त्याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
गोट्या मालिकेनंतर जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला होता. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते गिरीश घाणेकर यांचा मुलगा आहे. गिरीश घाणेकर यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, हेच माझे माहेर, वाजवा रे वाजवा, रंगत संगत, नवसाचं पोर, गोष्ट धमाल नाम्याची , राजाने वाजवला बाजा, बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मीना आणि गिरीश घाणेकर यांना ध्रुव आणि जॉय ही दोन मुलं आहेत. जॉय आणि त्याचा भाऊ ध्रुव या दोघांनी हाजमोलाच्या जाहिरातीत काम केले होते. याशिवाय श्याम बेनेगल यांच्या त्रिकाल या हिंदी चित्रपटात सुद्धा बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. गोट्या मालिकेव्यतिरिक्त जॉयने राजाने वाजवला बाजा या चित्रपटात काम केले होते. पुढे अभिनय क्षेत्र सोडुन त्याने आपल्या शिक्षणावर अधिक भर दिलेला पाहायला मिळाला. जॉय सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मिशिगन युनिव्हर्सिटी मधून त्याने एमबीएचे शिक्षण घेतले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो यूएसला वास्तव्यास आहे. Zynga, Yahoo, Amazon अशा मोठमोठ्या नामांकित कंपन्यांसाठी त्याने कधी सिनिअर इंजिनिअर, प्रोडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट हेड म्हणून काम केलं आहे.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून तो Talech कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून कार्यभार सांभाळताना दिसला. २०१२ पासून तो ‘यूएस बँक’ येथे हेड ऑफ प्रोडक्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. जॉयचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. त्यामुळे जॉय अभिनय क्षेत्रापासून बराच दूर गेलेला आहे. मात्र जॉयचा भाऊ ध्रुव आजही कलाक्षेत्राशी निगडित आहे. आणि तो संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना दिसला आहे.ध्रुव घाणेकर हा बॉलिवूड गायक आहे शिवाय शास्त्रीय आणि जॅझ फॉर्म मध्येही अनेक स्टेजवर तो परफॉर्मन्स सादर करतो. अभिनेत्री ईशीता अरुण ही ध्रुव घाणेकरची पत्नी आहे. २००२ सालच्या वैशाली सामंत हिने गायलेल्या ‘ऐका दाजीबा’ या गाण्यात मिलिंद गुणाजी सोबत ती झळकली होती. आज हा गोट्या म्हणजेच जॉय घाणेकर सॅन फ्रान्सिस्कोला स्थायिक असून अभिनयापासून दूर गेलेला पाहायला मिळतो. मात्र आजही गोट्या मालिकेमुळे तो प्रेक्षकांच्या स्मरणात राहीला आहे.