
‘देखणा नायक’ हे समीकरण मराठी मनोरंजन सृष्टीसाठी गौण मानले जाते, कारण इथे तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या अभिनयाची किंमत जास्त मानली जाते. दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या दिग्गजांनी या समिकरणाला छेद दिला पण तिथेच काही देखण्या नायकाच्या नावांचीही चर्चा झालेली पाहायला मिळाली. अर्थात मराठी सृष्टीला असे खूप कमी चेहरे लाभले आहेत त्यातील मोजक्या कलाकारांच्या खाजगी आयुष्यावर प्रकाश टाकूयात….

भैरू पैलवान की जय, गनिमी कावा, फटाकडी ,युगपुरुष, नवरा माझा ब्रह्मचारी, आपलेच दात आपलेच ओठ, शापित, आयत्या बिळावर नागोबा या आणि अशा कितीतरी चित्रपटातून दमदार नायकाची भूमिका साकारली ती “यशवंत दत्त” यांनी. त्यांचे मूळ नाव यशवंत दत्तात्रय महाडिक. पुण्यातील सदाशिव पेठ येथे ते वास्तव्यास होते. वडील दत्तात्रय महाडिक हे निर्मिती क्षेत्रातच असल्याने नाटक सिनेमाचे वातावरण त्यांनी लहानपणापासूनच अनुभवले होते. सरकारनामा सुगंधी कट्टा या चित्रपटातून यशवंत दत्त यांनी खलनायक देखील रंगवला होता. ११ नोव्हेंबर १९९७ रोजी वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षीच यशवंत दत्त यांनी जगाचा निरोप घेतला. यशवंत दत्त यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय कलेचा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत. त्यांचा मुलगा अक्षय यशवंत दत्त महाडिक हे मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत. धागेदोरे, आरंभ, ७ रोशन व्हीला यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. अक्षयची पत्नी ‘वेदांती भागवत महाडिक’ ही कथक नृत्यांगना आहे. Layom institute of Art’s and Media नावाने तिची पुणे, कोथरूड येथे तिची नृत्य संस्था आहे.

मराठी सृष्टीला लाभलेल्या देखण्या नायकापैकी एक नाव म्हणजे “अरुण सरनाईक”. रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन अशा अनेक चित्रपटात त्यांनी दमदार नायक साकारला. अभिनयाच्या जोडीला ते चित्रपटासाठी गाणीही म्हणत असत. २१ जून १९८४ रोजी अरुण सरनाईक पुण्याहून कोल्हापूरला जात असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात अरुण सरनाईक, पत्नी आणि मुलाचेही निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी सविता सरनाईक या मिरजला शिकायला होत्या. सविता सरनाईक या डॉक्टर आहेत. डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ ही पदवी त्यांनी मिळवली. वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून सेवा केली आहे. सविता सरनाईक यांनी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर रणजित नाईकनवरे यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन अपत्ये आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज साकारावे ते “सूर्यकांत मांडरे” यांनीच. हे ठाम मत आजही तमाम मराठी प्रेक्षकांचे आहे. मोहित्यांची मंजुळा, मल्हारी मार्तंड, अखेर जमलं, गनिमी कावा, थोरातांची कमळा या आणि अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सुशिला पिसे यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. काही वर्षांपूर्वीच सुशिला यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. प्रकाश मांडरे हे सूर्यकांत मांडरे यांच्या मुलाचे नाव. स्वरूपा मांडरे पोरे ही त्यांची नात आहे.

रमेश देव यांच्या नावातच देव आहे कारण नावाप्रमाणेच ते सगळ्यांशी विनम्रतेने वागत असत. उंचपुरे शरीर आणि देखणे नायक अशी त्यांनी मराठी सृष्टीत ओळख निर्माण केली होती. रमेश देव हे मराठी सृष्टीतील एकमेव असे कलाकार आहेत ज्यांनी मोठमोठ्या हिंदी कलाकारांच्या पंक्तीत म्हणजेच जुहू येथे स्वतःचे घर बनवले. स्वतः अमिताभ बच्चन यांनाही रमेश दव यांच्या या मोठ्या घराचे नेहमीच कौतुक वाटत असे. ‘माझ्या घरापेक्षा तुझं घर मोठं आहे’ असे ते रमेश देव यांना नेहमी म्हणत असत. रमेश देव आणि सीमा देव यांच्या पश्चात अजिंक्य आणि अभिनय ही दोन मुलं त्यांना आहेत. आरती, स्मिता या सुना आणि आर्य, तनया अशी नातवंड त्यांना आहेत.

मराठी सृष्टीला लाभलेल्या देखण्या नायकापैकी “रविंद्र महाजनी” हे नाव सर्वात पुढे येते. अर्थात त्या काळात त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या दिसण्याचीच जास्त क्रेझ तरुणींमध्ये पाहायला मिळाली होती. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वीच त्यांनी माधवी सोबत प्रेमविवाह केला होता. पण ही गोष्ट माहीत नसल्याने अनेक तरुणी , नायिका त्यांच्यासोबत लग्न करायला एका पायावर तयार होत्या. रविंद्र महाजनी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे गश्मीरने चालवला आहे. माझ्यापेक्षा माझे वडील देखणे आहेत अशी तो आजही प्रामाणिकपणे कबुली देताना दिसतो.