सोशल मीडिया हे एक अदभुत माध्यम आहे कारण हे माध्यम कधीकधी तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव देत असतो. काहीच दिवसांपूर्वी आम्ही एक पोस्ट शेअर केली होती. नेटकऱ्यांनी या पोस्टची दखल घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवला. बोलक्यारेषाच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेल्या अनेक कलाकारांची नव्याने ओळख करून देण्यात येत आहे. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरेचसे कलाकार हे काळाच्या ओघात पडद्यामागे गेले. ते कुठे आहेत कसे असतील याबद्दल सर्वानाच जाणून घेण्याची उत्सुकता दिसून आली. ‘गोंधळात गोंधळ ‘ हा १९८१ सालचा चित्रपट, या चित्रपटात एक देखणी नायिका पाहायला मिळाली ती म्हणजे ‘कविता किरण’.
घारे डोळे आणि निस्सीम सौंदर्याने कविता किरण यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. यानंतर कविता किरण मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटातही पाहायला मिळाल्या. कविता किरण यांची माहिती आलेल्या पोस्टवर तर जाणकार प्रेक्षकांनी त्यांच्या आणखी चित्रपटांची यादीच समोर ठेवली. मान अभिमान, नास्तिक, अपना बनालो, आपली माणसं या आणि अशा काही मोजक्या चित्रपटात कविता किरण यांनी काम केले. पण कालांतराने त्या अभिनय क्षेत्रातून बाजूला झाल्या. आज त्यांच्याबद्दल मिळालेली अधिक माहिती जाणून घेऊयात…
कविता किरण यांचे खरे नाव साधना रानडे. पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. मॉडेलिंगची आवड असल्याने त्यांनी जाहिरात क्षेत्रातही नशीब आजमावले होते. पियू साबणाच्या जाहिरातीत त्यांना झळकण्याची संधी मिळाली होती. पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘जीवन गाणे गातच राहावे…’, ‘धुंद हवा बहर नवा…’ ही गाणी त्यांच्यावरच चित्रित झालेली आहेत. साधना रानडे यांनी कविता किरण याच नावाने अभिनय क्षेत्रात नाव कमावले होते. पुढे सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या व्यक्तीसोबत त्यांनी लग्न केले . लग्नानंतर साधना रानडेच्या त्या साधना हर्षे नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. सध्या त्या नाशिक मधील देवळाली या शहरात वास्तव्यास आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल मिळालेली ही माहिती प्रेक्षकांसाठी निश्चितच सुखावणारी आहे. आज इतक्या वर्षानंतर त्या कशा दिसत असतील याबद्दलची उत्सुकता आता काही प्रमाणात निश्चितच स्थिरावली असेल. ज्यांनी ज्यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे मनापासून आभार.