
दिग्दर्शक नाग अश्विनच्या साय फाय महाकाव्य ‘कल्की 2898 एडी’ ने देश भरात बॉक्स ऑफिसवर छप्परफाड ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास ९५ कोटी कमाईचा आकडा पार केलेला पाहायला मिळाला. फक्त देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रभास, कमल हसन, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पाटनी, राणा दुगुबत्ती, किर्थी सुरेश, विजय देवरकोंडा अशी भलीमोठी स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटाचे बजेट ६०० कोटी इतके आहे. त्यामुळे बिग बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठीही तेवढाच खास ठरला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळाली. कल्की हा महाभारत या महाकाव्यावर आधारित चित्रपट आहे जो एक वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून बनवण्यात आलेला चित्रपट आहे.

चित्रपटाची सुरुवात ही युद्धाने होत असते जिथे श्रीकृष्ण अश्वत्थामाला सांगतात की हजारो वर्षांनंतर, जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त वाईटच घडत असेल , जेव्हा लोकांवर अत्याचार वाढू लागतील तेव्हा देवाचा अवतार असलेल्या कल्कीचा जन्म होईल. मात्र, त्याचा जन्म सोपा होणार नाही. त्याना पृथ्वीवर येण्यापासून रोखण्यासाठी आसुरी शक्ती पूर्ण शक्ती वापरतील. या स्थितीत अश्वत्थामाला देवाचे रक्षण करून आपले पाप धुण्याची संधी मिळेल. कल्की चित्रपटाने आतापर्यंतच्या तीन सर्वात मोठ्या ओपनिंग कलेक्शन मध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्याच दिवशी भारतात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ९५ कोटींची कमाई केली आहे.

तर परदेशात कल्की 2898 एडी ने ओपनिंग डे ला ६१ कोटी कमावले आहेत . तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ५४ कोटींचा आकडा पार केलेला पाहायला मिळाला. म्हणजेच जगभरात या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात १५० कोटींची कमाई केली आहे. तसं पाहिलं तर कल्कीला प्रेक्षकांनी थोडासा थंड प्रतिसाद दिला आहे कारण या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली तेवढी कमाई मात्र होताना दिसली नाही. RRR चित्रपटाने ओपनिंग डेला २२३ कोटीची कमाई केली होती तर बाहुबली २ हा चित्रपट ओपनिंगडे ला २१७ कोटीची कमाई करताना दिसला होता. या दोन चित्रपटानंतर जवान, सालार अशा चित्रपटांना भरभरून प्रतिसाद मिळाला होता.