‘ए गरम बांगड्या गरम बांगड्या’ एलिझाबेथ एकादशी चित्रपटातील झेंडू आता काय करते? पाहून आश्चर्य वाटेल
एलिझाबेथ एकादशी हा मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. एका सर्वसामान्य कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवली होती त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटातील चिमुरडे कलाकारही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसली. ‘गरम बांगड्या गरम बांगड्या’ म्हणत बांगड्या विकणारी झेंडू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या चित्रपटानंतर ही झेंडू इंडस्ट्रीतून गायबच झालेली पाहायला मिळाली. ती कुठे आहे आणि काय करते याबद्दल आज जाणून घेऊयात…
चित्रपटात झेंडूची भूमिका बालकलाकार सायली भांडारकवठेकर हिने साकारली होती. भलं मोठं आडनाव म्हणून चला हवा येऊ द्या मध्ये तिच्यावर एक विनोद झाला होता. अर्थात ही सायली या चित्रपटानंतर मात्र अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली दिसली. सायली ही मूळची सोलापूरची पण आता पुढील शिक्षणासाठी ती पुण्यात आली आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये ती फिजिओथेरपी शिकत आहे. सध्या दुसऱ्या वर्षात असल्याने लवकरच तिची परीक्षा देखील होणार आहे. त्यामुळे आता आपलं शिक्षण पूर्ण करून फिजिओथेरपीस्ट बनायचं एवढंच तिच्या डोक्यात आहे. पुण्याच्या मेडीकल कॉलेजमध्ये शिकायचं अशी तिची इच्छा होती. चांगले गुण मिळाल्याने इथे तिचं ऍडमिशन झालं.
दिवसभर कॉलेज, ओपीडी आणि संध्याकाळचा निवांत वेळ ती छान एन्जॉय करते आहे. चित्रपटावेळी आणि आताच्या तिच्या चेहऱ्यात भरपूर फरक आहे, त्यामुळे लोक पटकन ओळखू शकत नाहीत असेही ती सांगते. तूर्तास शिक्षणावर लक्ष असल्याने भविष्यात ती कधी अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार करेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. पण तिने साकारलेली झेंडूची भूमिका मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहील हे नक्की.