एकाच माळ्यावर घेतले दोन फ्लॅट… व्हाइट आणि रोज गोल्ड रंगाच्या थीमने अभिनेत्रीच्या घरानं वेधलं लक्ष
सप्टेंबर २०२३ मध्ये अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने मुंबईत एकाच बाजूला असलेले दोन फ्लॅट खरेदी केले होते. “स्वप्न खरी होतात” असे म्हणत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तू चाल पुढं या मालिकेच्यावेळी तिने हे फ्लॅट खरेदी केले होते. आता जवळपास एक वर्षाने धनश्रीने तिच्या या फ्लॅटचे इंटिरिअर करून घेतले आहे. ‘धनश्री दुर्वेश’ अशा नेम प्लेटने येणाऱ्याचे स्वागत होते. या घराला तिने व्हाइट आणि रोज गोल्ड रंगाची थीम निवडली आहे. त्यामुळे घराचा एरिया ऐसपैस आणि प्रसन्न वाटतो. एलेमेंट्स 5 डिझाइन स्टुडिओकडून तिने हे इंटेरिअर करून घेतलं आहे. या घराची खास झलक धनश्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुंबईत आपलं हक्काचं घर असावं अशी धनश्रीची इच्छा होती तीची ही इच्छा २०२३ मध्ये पूर्णत्वास आली. धनश्री तिचा नवरा दुर्वेश देशमुख सोबत पुण्याला राहत होती. मात्र मालिकेच्या शूटिंगनिमित्त तिला मुंबई पुणे असा सतत प्रवास करावा लागत असे. आपल्याला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचंय या दृष्टीने तिने मुंबईत घर घेण्याचा विचार केला. त्यात तिला तिच्या नवऱ्याचीही साथ मिळाली. शिवाय धनश्रीचा मुलगा कबीर हा देखील अजून खूप लहान आहे. ऐनवेळी कधीही शूटिंगला जावं लागत असल्याने ती कबिरला वेळ देऊ शकत नव्हती. पण आता मुंबईत घर घेतल्याने तिची ही मोठी अडचण मार्गी लागली आहे.
धनश्रीने चिठ्ठी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले होते. तुझ्यात जीव रंगला मालिकेत तिने नंदिताची विरोधी भूमिका चांगलीच गाजवली होती. या भूमिकेमुळे धनश्री प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर धनश्रीने कबीरच्या जन्मानंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला.
मात्र तू चाल पुढं मालिकेतून ती पुन्हा एकदा दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मोजक्याच कलाकृतीतून धनश्रीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत आणि म्हणूनच तिला हा यशाचा टप्पा गाठता आला आहे.