
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री २ च्या सुमारास सैफ अली खान राहत असलेल्या वांद्रे येथील घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला . अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला मोलकरणीच्या हातावर धारदार चाकूने हल्ला केला. तिचा आरडाओरडा पाहून सैफअली खान धावत आला. अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर चाकूने हल्ला चढवला. या झटापटीत सैफ अली खानवर धारदार शस्त्राने ६ वार करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने तिथून पळ काढला.

पाठीवर खोलवर वार करण्यात आल्याने सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान हा अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे कारण सांगितले जात आहे. वांद्रे पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असून सैफच्या घरचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. याबद्दलची अधिक माहिती लवकरच पोलिसांकडून देण्यात येईल.