बरेचसे न्यूज रिपोर्टर असो किंवा रेडिओजॉकी म्हणून काम केलेले कलाकार पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात येतात. यातील एक उदाहरण म्हणून द्यायचं असेल तर अभिजित खांडकेकर हा सुरुवातीला रेडिओजॉकी म्हणून काम करत होता. पण पुढे जाऊन त्याची कलाकारांसोबत ओळख झाली आणि त्याने अभिनय क्षेत्रातच नशीब आजमवलेले पाहायला मिळाले. तर स्मिता तळवलकर, स्मिता पाटील यादेखील सुरुवातीच्या काळात न्यूज रीडर म्हणून काम करत होत्या. पण अभिनेत्री झाल्यानंतर न्यूज अँकरिंगमध्ये इंटरेस्ट दाखवणारी अभिनेत्री आता चक्क थेट आयपीएल साठी अँकरिंग करताना दिसत आहे. झी मराठीवरील देवमाणूस ही लोकप्रिय मालिका तुम्हाला आठवत असेल. या मालिकेत अपर्णाचे पात्र दाखवण्यात आले होते ही अपर्णा डॉक्टरच्या जाळ्यात अडकते आणि तिचा डॉक्टरकडून शेवट करण्यात येतो.
आज हीच अपर्णा अभिनय क्षेत्र सोडून न्यूज अँकरिंग करताना दिसत आहे. अपर्णाची भूमिका अभिनेत्री ऐश्वर्या नागेश हिने साकारली होती. कॉलेजमध्ये असताना ऐश्वर्याने सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. याशिवाय तिने नाटकातूनही काम केले होते. देवमाणूस या मालिकेनंतर तिने न्यूज चॅनल साठी अँकरिंगचे काम केले. सध्या ती प्लॅनेट मराठी या सोशल वाहिनीसाठी न्यूज अँकरिंगचे काम करत आहे. या माध्यमातून ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पण आता ऐश्वर्याला प्रथमच आयपीएलसाठी अँकरिंग करण्याची संधी मिळाली आहे. टाटा आयपीएलच्या १७ व्या सिजनमध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदाच अँकरिंग केले त्यामुळे हा पहिला अनुभव घेत असताना तिच्या मनामध्ये एक भीती आणि दडपण होतं. पण त्याच उत्साहात ती स्टुडिओ मध्ये पोहोचली, तिथे तिच्यासोबत अतुल बेदाडे या मराठमोळ्या क्रिकेटर सोबत संवाद साधता आला.
अनेक नवीन गोष्टी शिकण्याची तिला संधी मिळाली छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता आलं असं ती तिच्या या पहिल्या अनुभवाबद्दल सांगते. जिओ सिनेमाने भारतातील विविध भाषेत आयपीएलचे प्रसारण सुरू केले आहे, त्यात ऐश्वर्याला ही संधी मिळाल्याने ती या कामाबद्दल खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री म्हणून सुरुवात केलेल्या ऐश्वर्याचा हा यशस्वी प्रवास पाहून भविष्यात ती एक प्रसिद्ध अँकर म्हणून ओळख मिळवेल यात शंका नाही.