का नाही व्यक्त झालास आत्महत्या हा पर्याय असू शकतो का? मी फक्त… भावाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावनिक पोस्ट
देवमाणूस या मालिकेतील अभिनेता एकनाथ गीते याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकनाथ गीते याचा धाकटा भाऊ विजय गीते याने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याजवळ का नाही बोलला अशी एक खंत एकनाथने भावासोबतचा फोटो शेअर करून व्यक्त केली आहे. एकनाथ गीते याने गावातून येऊन मराठी सृष्टीत चांगला जम बसवला. अल्पावधीतच भावाला मिळत असलेले हे यश पाहून विजय त्याच्या कामगिरीवर खूपच खूष असायचा. भावाने मिळवलेल्या या यशावर त्याला अभिमान असायचा. दोघेही भाऊ असले तरी त्यांच्यात मैत्रीचेही नातं अगदी घट्ट होतं. त्याचमुळे भावाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयावर एकनाथ भावुक झालेला आहे.
भावाच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करताना एकनाथ म्हणतो की,” एक आठवडा झाला तुला जाऊन आज अजूनही खरं वाटत नाहीये…हे वाईट स्वप्न संपून जाग का येत नाहीये मला ? असंच वाटतंय सतत…आयुष्यभराची हुरहूर लावून गेलास रे मनाला खूप सारे प्रश्न सोडून गेलास कुठे शोधू मी उत्तरं ? आणि उत्तरं मिळाली तरी तू नाहीस न दिसणार परत कधीच, कुठेच…..फक्त भाऊ नव्हतो ना आपण मित्र पण होतो ना रे का नाही व्यक्त झालास माझ्या जवळ ह्या वेळेस ? आत्महत्या पर्याय कसा असू शकतो रे विजु ? कसं जगायचं आम्ही आता तुझ्याशिवाय बाळा ???”.. एकनाथ गीते हा मूळचा परभणीचा. जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचे गाव. अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी तो परभणीहुन मुंबईला आला. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर्स ऑफ थिएटर आर्टस् केले.
अशातच त्याला नाटकातून काम करण्याची संधी मिळाली. मालिकेतून छोट्या छोट्या भूमिकेत दिसणारा एकनाथ देवमाणूस मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. या मालिकेनंतर एकनाथला बऱ्याच मालिकेतून झळकण्याची संधी मिळाली. एकनाथची आई जेमतेम चौथी इयत्तेपर्यंत शिकलेली. वडिलांच्या पश्चात त्यांची कमी न भासू देता आईने या भावंडाना मोठे केले. पण आता भावाने सोडलेली ही साथ पाहून एकनाथ खूपच भावुक झाला आहे. या दुःखातून त्याला बाहेर पडण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.