आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात बबिता फोगटची बालपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरच्या निधनाच्या बातमीने कलासृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. आज शनिवारी सकाळी सुहानीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. सुहानी फक्त १९ वर्षांची होती त्यामुळे तिच्या मृत्यू बाबत एकच चर्चा सुरू आहे. सुहानीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ती फरीदाबादच्या सेक्टर १७ मध्ये राहायला होती. फरीदाबाद येथील सेक्टर १५ येथील अजरोंडा स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सुहानीचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुहानी बरेच दिवस उपचार घेत होती. अशातच तिच्या शरीरात फ्लूएड जमा झाल्याचे सांगितले गेले. याचाच दुष्परिणाम झाल्याने तिच्या शरीरावर प्रचंड प्रमाणावर सूज आली होती. दरम्यान सुहानीच्या अचानक निधनाने तिचे आईवडील दोघेही दुःखात आहेत.
दंगलनंतर सुहानीने अभिनयातून काढता पाय घेतला होता, कारण तिला तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. एका मुलाखतीत तिने याबद्दल म्हटले होते की ‘मला चित्रपटात काम करायचं नाही आधी मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे’ हे तिचे ध्येय होते. २०१६ मध्ये दंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. झायरा वसीम आणि सुहानी भटनागर यांनी गीता आणि बबिता त्यांच्या लहानपणीच्या भूमिका साकारल्या होत्या. झायरा हिनेही चित्रपटात काम करणार नसल्याचे तेव्हा जाहिर केले होते. त्यानंतर तिला ट्रोलही करण्यात आले होते. तर सुहानी ही सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळाली होती. लहान असल्यापासूनच सुहानीला चित्रपटांचे आकर्षण होते. पण आधी शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी तिने दंगल नंतर कुठलाही प्रोजेक्ट स्वीकारण्याचे नाकारले होते. पण आता अवघ्या १९ वर्षाच्या सुहानीचा मृत्यू झाला अशी बातमी मनाला चटका लावून गेली आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल.