एक दिवस जुन्या मैत्रिणीने मला फोन केला तो रवींद्रने ऐकला… रविंद्र महाजनी यांनी पत्नीवर पहिल्यांदा हात उचलला
रविंद्र महाजनी हे किती स्वछंदी व्यक्तिमत्त्व होतं याचे खुलासे माधवी महाजनी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. चित्रपटात काम केलं की मिळालेले पैसे ते पत्नीकडे आणून देत. पार्ट्या करणं, मुलांचे वाढदिवस थाटात करणं, मित्र मैत्रिणींसोबत कुटुंबाला घेऊन फिरायला जाणं, मुलांसाठी अख्ख स्विमिंगपुल बुक करून पोहायला नेणं. अशा गोष्टी रविंद्र महाजनी खूप आपुलकीने करत असत. जेव्हा रविंद्र महाजनी चित्रपटात काम करू लागले तेव्हा त्यांचे ते भरभराटीचे दिवस होते. आपण व्यसनी, जुगार खेळत असलो तरी माधवी आपल्याला सांभाळून घेऊ शकते असा त्यांना विश्वास होता. त्याचमुळे रविंद्र महाजनी यांचे पत्नीवर खूप प्रेम होते. पण एका फोन कॉल मुळे ते खूप अग्रेसिव्ह झाले आणि माधवी , मुलांवर ते हात उचलू लागले.
माधवी महाजनी यांनीच याबाबत एक खुलासा करताना म्हटले आहे की, “आमचं सगळं चांगलं चाललं होतं. सगळे मित्र मैत्रिणी कुटुंबासोबत एकत्र फिरायला जायचो. कधीच कोणाबद्दल संशय नसायचा. एक दिवस माझ्या जुन्या मैत्रिणीने मला फोन केला. मी वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये फोनवर बोलत होते. जुन्या आठवणी निघाल्या तेव्हा ती मला म्हणाली की ‘ तुला आठवतो का गं तो, त्यानं तुला प्रपोज केलं होतं’. तेव्हा मीही ‘हो येते कधी कधी आठवण’ असे तिला हसून म्हणाले. शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या की असे विषय निघायचे. तेवढ्यात माझी मुलगी रश्मी खालून वर आली ‘आई तु काय बोलतेस फोनवर? बाबा कान लावून खालच्या फोनवरून ऐकत आहेत.’ मला यात काही विशेष वाटलं नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की रवी या गोष्टी मनाला लावून घेऊ शकतो. तेव्हापासून त्याचं बिनसलं. इतर वेळी तो रागावत असे पण त्यानंतर त्याने माझ्यावर हात टाकायला सुरुवात केली. ‘तो कोण आहे? कुठं असतो ? त्याच्याशी लग्न लावून देतो मी ‘ असं तो म्हणायला लागला.
या एवढ्या छोट्याशा गोष्टीला त्याने खूप महत्व दिलं होतं. मी दिसायला अतिशय साधारण, तो खूप देखणा, सगळ्या मुली त्याच्यावर भाळायच्या पण माझं फक्त त्याच्यावरच प्रेम होतं. त्या फोन वरच्या बोलण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता. तो अचानक खूप चिडायचा, मारायचा, मुलांवर ओरडायचा, भांडायचा. अनेक वर्षे असंच चालू होतं पण कालांतराने तो शांत झाला. माझ्यावर हात उगारायचा थांबला. अचानक घरातून निघून जायला लागला. स्वतःचं स्वतः करू लागला. दुबईला बहिणीकडे राहून आला. मी त्याला कुठे जातो, काय करतो काहीही विचारायचे नाही. तो फक्त आमच्यात आहे याचेच मला समाधान असायचे.”