आशा भोसले यांनीच दादांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण सोबतच ह्या २ अटी घातल्या … या २ अटी पाहून दादा कोंडके पडलेले बुचकळ्यात
आज ८ सप्टेंबर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ९० वा वाढदिवस. आशा भोसले आणि दादा कोंडके यांचे प्रेमसंबंध होते हे सर्वश्रुत आहेच पण एकटा जीव या दादांच्या आत्मचरित्रात दादा कोंडके यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न का नाही केले याचा खुलासा केलेला आहे. सत्तरच्या दशकात दादा कोंडके यांचे विच्छा माझी पुरी करा हे धमाल नाटक खूप गाजले होते . आशा भोसले यांनी या नाटकाच्या जवळपास ६५ प्रयोगाला हजेरी लावली होती. त्याकाळात आशा भोसले आणि दादा कोंडके अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. ही गोष्ट लता दिदींनाही ठाऊक होती. दादा कोंडके यांचे पहिले लग्न नलिनी सोबत झाले होते. घरच्यांच्या इच्छेखातर दादांनी नलिनीशी संसार थाटला मात्र अवघ्या चार वर्षांतच त्यांनी नलिनीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
१९६८ साली नलिनीला ४० हजारांची पोटगी देऊन त्यांनी घटस्फोट घेतला होता. याचदरम्यान विच्छा माझी पुरी करा या नाटकातील नृत्यांगना निलाच्या त्या जवळ आले. ते दोघेही लग्न न करताच नवरा बायकोप्रमाणे एकत्र राहू लागले. पण निलाचा स्वभाव त्यांच्या संसारात आडकाठी बनून गेला. याचदरम्यान दादांना हृदविकाराचा सौम्य झटका आला त्यात त्यांना निलाचा विक्षिप्त स्वभाव जवळून अनुभवायला मिळाला. दवाखान्यात असताना दादांकडे पाठ फिरवलेल्या निलाला त्यांनी आपल्या आयुष्यातून बाजूला केले ते कायमचेच. आयुष्यातल्या या पडत्या काळातच दादांची आणि आशा भोसले यांची भेट घडून आली. आशा भोसले यांच्याही आयुष्यात एकाकीपणा आला होता. विच्छा माझी पुरी करा हे नाटक पाहायला आशा भोसले यांनी अनेकदा हजेरी लावली. त्याचवेळी दोघांच्याही भेटीगाठी वाढू लागल्या. आशा भोसले यांना हॉटेलमध्ये जाण्याची फिरण्याची भारी हौस. नाटक रद्द करून त्या दादांना फिरायला घेऊन जात. दादांच्या वाढदिवसाला मौल्यवान भेटवस्तू त्या देऊ लागल्या. दादांनीच एकटा जीव या आत्मचरित्रात याबद्दल खुलासा केला आहे. आशा भोसले यांनीच दादांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्यात त्यांनी दादांना दोन अटी घातल्या होत्या.
एक म्हणजे लग्नानंतर मी कोंडके आडनाव लावणार नाही आणि दुसरी अट म्हणजे लग्नानंतर माझ्या फ्लॅटवर राहायला यायचं. या दोन्ही अटी पाहून दादा कोंडके विचारातच पडले. हा गुंता सोडवण्यासाठी ते कोल्हापूरला असलेल्या भालजी पेंढारकर यांच्याकडे गेले. आशा भोसले यांच्या लग्नाच्या प्रस्तावाबाबत त्यांनी बाबांना सविस्तर माहिती दिली. तेव्हा भालजी पेंढारकर यांनी दादांना विश्वासात घेऊन अजिबात लग्नाच्या भानगडीत पडू नकोस असा मोलाचा सल्ला दिला. तुम्हाला तुमचे कार्यक्रम आहेत त्यांना मुलं बाळं आहेत, ते तुम्हाला घरगड्यासारखे राबवून घेतील. दादांनी बाबांचा हा सल्ला ऐकला आणि आशा भोसले यांना लग्नासाठी नम्रपणे नकार दिला. त्यानंतर मात्र दोघांच्याही भेटीगाठी कमी झाल्या. केवळ व्यावसायिक कारणासाठी त्यांची भेट घडून येत असे. त्याचदरम्यान आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्याशी संसार थाटला.