प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं हक्काच्या घराचं स्वप्न झालं पूर्ण…काही दिवसांपूर्वीच झाला होता विवाहबद्ध
छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याने त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. हा अभिनेता आहे ठिपक्यांची रांगोळी मालिका फेम चेतन वडनेरे. अभिनय क्षेत्रात जायचं ही स्वप्न घेऊन चेतन मुंबईत दाखल झाला. इथे त्याची ओळख झाली ती अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत. नाटक एकांकिकेतून काम करत असताना चेतन मालिकेतून छोट्या छोट्या भूमिका साकारू लागला. अलटी पलटी सुमडीत कल्टी या मालिकेतून तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसला. झी मराठीने देऊ केलेल्या या संधीमुळे चेतन प्रकाशझोतात आला. त्यानंतर तो स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत झळकला.
या मालिकेने चेतनला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. यशाचा हा एकेक टप्पा सर करत असतानाच आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न त्याने पूर्ण केलं. अर्थात यात त्याला त्याची पत्नी आणि कुटुंबियांचीही मोठी साथ मिळाली. चेतन वडनेरे हा नाशिकचा आहे इथेच आपल्या हक्काचं घर असावं असा त्याचा विचार होता. याच उद्देशाने त्याने नाशिकमध्ये घर बुक केलं. त्याचं हे घर आता पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळत आहे. नवीन घराची एक झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याचं हे घर पाहून सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनीही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
चेतन वडनेरे आणि ऋजुता धारप हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र. या मैत्रीचे प्रेमात आणि पुढे लग्नात रूपांतर झाले. कलाक्षेत्रात काम करायचं म्हणून मुंबईत आलेल्या चेतनला राहायचं कुठे असा मोठा प्रश्न होता. पण ऋजुताच्या मदतीने त्याला हे सहज सोपे होऊन गेले. अर्थात दोघांच्याही स्ट्रगलचा काळ एकमेकांनी जवळून अनुभवलेला होता. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याचे सामर्थ्य दोघांमध्ये होते. अशातच त्यांनी लग्न करून आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकत्रित पाहिलेल्या स्वप्नाची अशीच पूर्तता होवो हीच एक सदिच्छा.