१० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा “चला हवा येऊ द्या” शो संपला… अभिनेत्याने भावुक होऊन लिहली पोस्ट
झी मराठीवर गेली दहा वर्षे तग धरून असलेला शो चला हवा येऊ द्या लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काल मंगळवारी या शोचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला, यावेळी कलाकारांनी भावुक होऊन एकमेकांना निरोप दिला. चला हवा येऊ द्या या शोने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेश दौरे देखील केले होते. अनेक नवख्या कलाकारांना त्यांनी अभिनयाची संधी मिळवून दिली होती. या दहा वर्षाच्या काळात कलाकारांनी अनेक चढउतार अनुभवले. स्त्री भूमिकेमुळे भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर अचूक विनोदाच्या टायमिंगने काहींनी प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकून घेतली. सागर कारंडेने निभावलेला पोस्टमन असो किंवा श्रेया बुगडे, कुशल बद्रिकेची मिमिक्री या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले आहे.
आणि म्हणूनच इतक्या वर्षांच्या सहवासानंतर चला हवा येऊ द्या निरोप घेतेय हे जाणूनच कलाकार भावुक झाले आहेत. सुरूवातीला सागर कारंडे याने चला हवा येऊ द्या मधून एक्झिट घेतली तेव्हा अनेकांनी त्याला परत बोलावण्याची मागणी केली.पण तरीही हा शो अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिला. कलाकारांना आर्थिक स्थैर्यता मिळवून देण्याचे काम चला हवा येऊ द्या ने केले आहे. हिंदीतील कपिल शर्मा आणि मराठीतील चला हवा येऊ द्या हे चित्रपट प्रमोशनाचे प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळे बॉलिवूड मंडळी सुद्धा चित्रपट प्रमोट करण्यासाठी चला हवा येऊ द्याचे उंबरठे झिजवताना दिसले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या शोचा खाली घसरत चालला होता. हेच जाणून झी मराठीने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर शोचा सर्वेसर्वा निलेश साबळे यानेही पर्यायी मार्गांची निवड केली. काही दिवसांपूर्वीच निलेश साबळेने चला हवा येऊ द्याला रामराम ठोकला होता.
आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्याने आणि वेबसिरीज तसेच नवीन चित्रपटाच्या शुटिंगमुळे त्याला चला हवा येऊ द्या शोसाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे सूत्रसंचालकाची जबाबदारी श्रेया बुगडेला देण्यात आली होती. दहा वर्षांच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याला निलेश साबळे गैरहजर होता तेव्हाच हा शो एक्झिट घेणार असे संकेत प्रेक्षकांना मिळाले होते. अंकुर वाढवेने शुटींगचा शेवटचा दिवस म्हणत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे त्यात त्याने सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आणि लवकरच एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येईल असे आश्वासन दिले आहे.