कलर्स मराठीवरील बिग बॉसचा ५ वा सिजन निक्की तांबोळीच्या वागण्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. निक्की तांबोळी ही सतत वर्षा उसगावकर यांना टार्गेट करताना पाहायला मिळाली. बिग बॉसने बेड काढून घेतल्यामुळे तर तिने वर्षा उसगावकर यांची अक्कल काढली. निक्की एवढ्यावरच थांबली नाही तर ती आर्या जाधव आणि अंकिता वालावलकर यांच्याशीही वाद घालताना दिसली. तिच्या या सततच्या वादाला कंटाळून प्रेक्षकांनी तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याची मागणी करू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या पहिल्याच टास्कमध्ये ती अंकिता सोबत धक्काबुक्की करताना दिसली. पण कोकणच्या या हार्टगर्लने निक्कीला सडेतोड उत्तर दिलेले पाहायला मिळाले.
बिग बॉसच्या घरात काल पहिली नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली. अवघ्या तीन दिवसात घरातील सदस्यांना ज्यांचे वागणे खटकले त्यांनीच त्याला नॉमिनेट केलेले पाहायला मिळाले. ज्या सहा सदस्यांना नॉमिनेट केलं गेलं ते सदस्य आहेत योगिता चव्हाण, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, पुरुषोत्तम पाटील आणि धनंजय पोवार. प्रेक्षक बिग बॉसच्या घरातील या सहा सदस्यांपैकी कोणाला वाचवतील हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. वर्षा उसगावकर यांनीही या घरातून बाहेर पडावं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे कारण निक्की तांबोळीकडून त्यांचा सततचा अपमान पाहून त्यांची इमेज खराब होत असल्याचे म्हटले जात आहे.
तर धनंजय पोवार यांची प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनली आहे त्यामुळे त्यांना सर्वात जास्त मतं मिळतील आणि ते बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यापासून वाचतील असा ठाम विश्वास त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे योगिता चव्हाण किंवा पुरुषोत्तम पाटील यांच्यापैकी एक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याची दाट शक्यता वाटत आहे. तेव्हा प्रेक्षकांचा कौल कोणाच्या बाजूने असेल हे रविवारच्या भागातच जाहीर केलं जाईल. तूर्तास रितेश देशमुखने विकेंड वॉरमध्ये निक्की तांबोळीचा खरपूस शब्दांत समाचार घ्यावा अशी प्रेक्षकांनी अपेक्षा ठेवली आहे.