आज १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात येत आहे. लहान लहान चिमुरडे महाराजांची वेशभूषा करून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. अशातच मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अभिजित बिचुकले हे मूळचे साताऱ्याचे. छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून ते साताऱ्यातील शिवतीर्थावर पोहोचले आहेत. डोक्यावर जिरेटोप, हातात तलवार अशा पेहरावात आल्यानंतर महाराजांना त्यांनी मानवंदना दिली. उपस्थितांशी संवाद साधताना अभिजित बिचुकले म्हणाले की, “एका कलाकार या नात्याने मला किंवा अनेक कलाकारांना छत्रपतींच्या रोलमध्ये यावं वाटतं. त्यांची रंगछटा घ्यावी वाटते, वेशभूषा करावी वाटते. शिवरांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलो.
या माध्यमातून मी जनतेला आणि आजच्या पिढीला एक गोष्ट सांगेन की इथे सर्व जनता गुण्यागोविंदाने नादवायची असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेबांचं संविधान जिवंत ठेवायचं असेल तर या दोन्ही महापुरुषांना नतमस्तक होऊन त्यांचं अनुकरण केलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान अभिजित बिचुकले या वेशभूषेमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोलही केलेलं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिजित बिचुकले हे बॅनर बाजीमुळे चर्चेत आले होते. साताऱ्यात ठिक ठिकाणी त्यांनी एका विशिष्ट पद्धतीचे बॅनर झळकवले होते. ज्यात प्रभू श्रीरामांसमोर ते हात जोडून नतमस्तक झालेला फोटो छापण्यात आला होता. मीडियाशी बोलताना त्यांनी या फोटो मागची भावना व्यक्त केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की मी प्रभू श्रीरामाचा भक्त असल्याचे या फोटोतून दिसून येईल. माझे असंख्य फॅन आहेत पण मी मोदींचा फॅन आहे. मोदींनी प्रभू श्रीरामाचा बालपणीचा एक फोटो छापला त्यात त्यांनी श्रीरामाचे बोट पकडले होते. ते मुलाला शाळेत नेतायेत असं त्यातून दिसत होतं ते श्रीरामाचे वडील झाले असं त्यातून दिसून आलं पण मी प्रभू श्रीरामाला आई वडिलांपेक्षा मोठं मानतो ते सगळ्या विश्वाचे तारणहार आहेत. असे त्यांनी यावेळी म्हटले होते.