
भाभीजी घर पर है या लोकप्रिय मालिकेतील अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्या घटस्फोटित नवऱ्याचे निधन झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच शुभांगी अत्रे हिने पियुष पुरे याच्यापासून घटस्फोट घेतला होता. पियुष पुरे गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. याच आजारपणात त्याचे निधन झाल्याने शुभांगी अत्रे भावुक झाली आहे. ‘सध्या तरी या विषयावर बोलण्यासाठी माझी मनस्थिती बरी नाही’ अशी प्रतिक्रिया तिने मीडियाला दिली आहे.

२००३ साली शुभांगी अत्रे हिने पियुष पुरे सोबत इंदोरमध्ये थाटात लग्न केले होते. २००५ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली. सध्या त्यांची मुलगी आशी ही अमेरिकेत शिक्षण घेत आहे. मात्र लग्नाच्या २३ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुभांगीने घटस्फोटाची बातमी जाहीर केली होती.

खरं तर हे लग्न टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न करण्यात आले होते. घटस्फोटाच्या प्रक्रियेचा त्रास मुलीला होऊ नये म्हणून दोघांनी पुरेपूर प्रयत्न केले. पियुष बद्दल सांगायचं तर डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होता. पण आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून तो बेडवरच होता. अशातच त्याच्या निधनाची बातमी समजताच शुभांगी अत्रे भावूक झालेली पाहायला मिळत आहे.