काल लेखकाचे निधन आणि आज प्रसिद्ध अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध… लोकप्रिय हिंदी मालिकेसंदर्भात धक्कादायक घटना

हिंदी टीव्ही माध्यमातून विनोदी मालिकांना चांगली लोकप्रियता मिळत आहे. पण अशातच या विनोदी मालिकेच्या कलाकारांबाबत वाईट घटना घडताना दिसत आहेत. भाभीजी घर पर है ही हिंदी टीव्ही मालिका खूप लोकप्रिय आहे. पण सोमवारी या मालिकेचा लेखक मनोज संतोषी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सगळेच जण हळहळ व्यक्त करताना दिसले. हे घडते न घडते तोच या मालिकेचा मुख्य कलाकार सेटवरच बेशुद्ध झालेला पाहायला मिळाला. अभिनेते आसिफ शेख यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे.

पण काल मालिकेच्या सेटवर ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. डेहराडून येथे शूटिंग सुरू असलेल्या भाभीजी घर पर है या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून ऍक्शन सीन शूट केले जात आहेत. सलग दोन दिवस ऍक्शन शूट करत असल्याने आसिफ शेख यांना मणक्याचा त्रास जाणवू लागला. पण तशाही अवस्थेत ते शूटिंग करतच राहिले. संध्याकाळी ७-८ च्या दरम्यान ते थोडा वेळ आराम करण्यासाठी मेकअप रूम मध्ये झोपले होते. पुन्हा सेटवर बोलावण्यात आले तेव्हा त्यांना धड उठताही येत नव्हते. पाठीचे दुखणे टाचांपर्यंत पोहोचले होते. पायाची एक शीर असंख्य वेदना देत असतानाही ते चालण्याचा प्रयत्न करत होते. पण १०० मीटर अंतही त्यांना चालवेना अशातच ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले.

त्यानंतर आसिफ शेख यांना व्हीलचेअरवर बसवण्यात आले आणि डेहराडून येथील नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आसिफ शेख यांना उपचारानंतर आता घरी पाठवण्यात आलं असून किमान एक आठवडा तरी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. दरम्यान भाभीजी मालिकेबाबत एकापाठोपाठ एक अशा वाईट घटना घडत असल्याने प्रेक्षकांनीही काळजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.