बाहुबली चित्रपट अभिनेत्री अनुष्का शेट्टी हीने तिच्या निस्सीम सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. पण हीच अनुष्का आता एका दुर्मिळ आजाराने त्रस्त झाली आहे. अनुष्का शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिने या आजाराबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. हसणं हा एक आनंदाचा क्षण मानला जातो. पण हेच हसणं अनुष्का साठी घातक बनलं आहे. कारण काही विनोदी घटना बघितली किंवा ऐकली की अनुष्काला खूप हसायला येतं आणि पुढे ती जवळपास १५ ते २० मिनिटं सतत हसतच राहते.
या दुर्मिळ आजाराबद्दल अनुष्का म्हणते की, “मला हसण्याचा आजार आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, ‘हसणे ही समस्या आहे का?’ माझ्यासाठी, ती आहे. जर मी हसायला लागले तर मी १५ ते २० मिनिटे स्वतःला थांबू शकत नाही. विनोदी दृश्ये पाहताना किंवा चित्रीकरण करताना, मी अक्षरशः हसत जमिनीवर लोळते यामुळे कित्येकदा शूट थांबवण्यात आले आहे”. अनुष्काच्या या दुर्मिळ आजाराबद्दल कळताच अनेकांना आश्चर्य वाटत आहे. हा आजार म्हणजे ” रेअर लाफिंग डिसीस” आहे. ही स्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात, स्यूडोबुलबार इफेक्ट (पीबीए) म्हणून ओळखली जाणारी ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे जी मेंदूवर परिणाम करते यामुळे ती व्यक्ती बराचवेळ हसत राहते किंवा रडत राहते. रेअर लाफिंग डिसीस म्हणजेच PBA ची लक्षणे आणि त्यातील तीव्रतेमध्ये बदलू शकतात. एखादी व्यक्ती एखाद्या दुःखद प्रसंगावर हसते किंवा विनोदी परिस्थितीत रडते.
हे कार्य काही सेकंदांपासून कित्येक मिनिटांपर्यंत टिकून राहू शकते. PBA च्या तीव्रतेमुळे सामाजिक पेच निर्माण होतो परिणामी ती व्यक्ती चिंताग्रस्त आणि नैराश्येत येते. स्यूडोबुलबार इफेक्ट (पीबीए) ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्याचे वैशिष्ट्य अचानक, अनियंत्रित हसणे किंवा रडणे अशा प्रसंगांद्वारे दिसून येते. जे समोर घडत असलेल्या परिस्थितीशी असमान किंवा विरुद्ध घडते . यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती गोंधळात पडतात आणि त्यामुळे या गोष्टी त्रासदायक ठरतात. अनुष्का शेट्टीला झालेल्या या दुर्मिळ आजारामुळे तिचे चाहते देखील आता चिंतीत झाले आहेत. ती या आजारातून लवकरात लवकर बरी होवो अशी प्रार्थना केली जात आहे.