अनेकदा प्रवासात झोप आल्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सूटतो आणि त्यामुळे मोठमोठे अपघात घडून येत असतात. याचाच विचार करून पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या आयुष घोलप याने त्याच्या भन्नाट कल्पनाशक्तीने बझर गॉगल तयार केला आहे. आयुषने बनवलेल्या या गोगलमध्ये सेन्सॉर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना तुम्हाला झोप आली तर लगेचच बझर वाजतो. आयुषच्या या कल्पनाशक्तीने त्याचे शिक्षकच नाहीत तर आसपासची लोकही त्याचे कौतुक करत आहेत.
आयुष घोलप हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. वडील पारंपरिक शेती करत असतात. अशातच आयुष शेतीतील कामाचा ताण कमी कसा करता येईल याचा सतत विचार करत असतो. विहिरीतून शेतीला पाणी देणं असो किंवा अशा अवजड कामांना सोपे कसे करता येईल, स्वयंचलित यंत्रणा कशी बनवता येईल? यावर तो शिक्षकांना प्रश्न विचारत असतो. आयुष न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल या शाळेत आठवी इयत्तेत शिकतो आहे. गेल्याच वर्षी त्याने शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात रोबो बनवला होता. त्याचा हा रोबो हलत नव्हता पण तरीही तो कुठल्या कुठल्या पद्धतीने हलवता येईल याचे त्याने प्रात्यक्षिक दाखवले होते. या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात आयुषने बझर गॉगल बनवला आहे. याचे शाळेतील शिक्षकांना खूप कौतुक आहे. आयुषला योग्य दिशा देण्याचे काम त्याच्या शाळेतील शिक्षक करत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन बोरकर यांनाही एका गावात वाढणाऱ्या आयुषचे कुतूहल वाटत आहे. शाळेच्या संस्थापिका स्वाती मुळे या देखील आयुषच्या कामगिरीवर खुश आहेत. स्वाती मुळे या आयुषला पुण्यातील आयसर इन्स्टिट्यूट मध्ये जे सायन्स एक्सपेरिमेन्ट आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन देण्याचे काम करतात तिथे पाठवणार आहेत. आयुष शाळेच्या पहिल्या इयत्तेत शिकत असल्यापासूनच हुशार मुलगा म्हणून ओळखला जातो. मल्लखांब, क्रिकेट, कबड्डी या खेळातही तो हिरीरीने सहभागी होतो. अभ्यासातही तो खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य कुटुंबात वाढणाऱ्या आयुषची ही कल्पनाशक्ती भन्नाट आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.