नुकताच साखरपुडा झालेली ही कलाकारांची जोडी अडकणार विवाहबंधनात… लगीनघाई आणि केळवणाची सुरुवात
मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात प्रेमाचे सूर जुळलेली कलाकारांची जोडी नोव्हेंबर महिन्यात विवाहबद्ध होताना दिसणार आहे. मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या स्पर्धांकांनी सहभाग दर्शवला होता. तेव्हा या घरात असतानाच प्रसादने अमृताला सिने स्टाईलने प्रपोज केले होते. अपूर्वा नेमळेकरच्या म्हणण्यानुसार प्रसादने गमतीगमतीत हे प्रपोज केले मात्र त्यानंतर ते दोघेही खरोखरच एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अमृता आणि प्रसाद एकमेकांना भेटू लागले तेव्हा या चर्चेला अधिकच उधाण आले. दोघांचे एकत्रित असलेले व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.
मात्र त्यावेळी त्यांनी प्रेमात नसल्याचे सांगितले. पण कालांतराने त्यांना ही बातमी जाहीर करावीच लागली तेव्हा या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. जुलै महिन्यात गुपचूप साखरपुडा झाल्याची बातमी या दोघांनी सांगितली तेव्हा सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या. साखरपुड्याच्याच दिवशी प्रसाद आणि अमृताने १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न करणार असल्याचे सांगितले. आज अमृता आणि प्रसादचे पहिले केळवण साजरे करण्यात आले. हे केळवण अमृतासाठी खूपच खास ठरले कारण अमृताचे आजोबा म्हणजेच आईच्या वडीलांनी वयाच्या ८७ व्या वर्षी सगळं काही प्लॅनिंग करून अमृता आणि प्रसादसाठी भेटवस्तू आणि बुके आणले आणि त्या दोघांचे पहिले केळवण अगदी थाटात साजरे केले.
अमृता आणि प्रसादने यावेळी एकमेकांना घास भरवून उखाणा घेतला. अमृता आणि प्रसादचा साखरपुडा झाला त्यावेळी त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने आणि मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत एकमेकांना अंगठी घातली होती. त्यामुळे त्यांच्या साखरपुड्याला त्यांना कोणालाही बोलावते आले नाही. मात्र आता दोघांचेही लग्न धुमधडाक्यात होणार असल्याने इंडस्ट्रीतील मित्रमंडळींना ते आमंत्रण देणार आहेत. त्यामुळे प्रमृताच्या लग्नाचा थाट कसा असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.