
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. संभाजी महाराज शूरवीर होते त्यांचं बलिदान मोठं होतं हे छावा चित्रपटातून समोर आलं. एकीकडे ही बाजू समोर येत असताना काहींनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. ते नशेच्या आहारी गेले होते असे त्यांच्याबद्दल बोलले गेले. या उलटसुलट चर्चा पाहून अमोल कोल्हे यांनी यावरचं मौन सोडलं आहे. जर बोललो नाही तर मूकसंमती समजली जाते म्हणून मला हे बोलावं लागतंय अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओत छत्रपती संभाजी महाराज कसे होते याचे अनेक दाखले त्यांनी इथे समोर आणले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, राम गणेश गडकरी यांनीही नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांवर नशेबाज असल्याचे म्हटले आहे. मुळात ही पाळंमुळं खोलवर रुजली गेली असल्याने हा चुकीचा इतिहास समोर येत गेला.
याची खरी सुरुवात झाली ती मल्हार रामराव चिटणीस यांनी १८११ मध्ये ‘चिटणीशी बखर ‘ लीहिली त्यात हे लिहिण्यात आलं. पुढे याचा संदर्भ म्हणून आदिलशाहीच्या काळात बखर लिहिणाऱ्या मुहम्मद झुबेर याने ग्रंथ लिहिला जो चिटणीस बखरनंतर १३ वर्षाने लिहिला गेला. ग्रँड डफने देखील चिटणीसांच्या बखरचा संदर्भ घेऊन हा इतिहास लिहिला आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली . मुळात चिटणीसांची बखर हा समकालीन पुरावा नाही. खंडो बल्लाळ यांचा नातू म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांचा मल्हार रामराव चिटणीस हा पणतू होता ज्याने ही बखर लिहिली १८११ मध्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जवळपास १२२ वर्षानंतर. यात छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कटकारस्थानाच्या आरोपमध्ये सहभागी झाल्याच्या कारणास्तव हत्तीच्या पायी दिलं त्यामुळे पणजोबाला हत्तीच्या पायी दिलेल्या रागामुळे हा रोष चिटणीसांच्या बखरीत उतरला.

तिथे संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. या सगळ्या प्रवासात पुढे वेगवेगळ्या लेखकांनी अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील , गोळवलकर गुरुजी, राम गणेश गडकरी या सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याच्या पापात वाटा आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यानंतर सेतू माधवराव पगडे, वा सी बेंद्रे, डॉ कमल गोखले , डॉ जयसिंगराव पवार या सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी अफाट परिश्रम घेतले. आता विकिपीडियावर जी चुकीची माहिती दिली गेली आहे त्यात बरेचसे बदल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलकडे तशा सूचना दिल्या आहेत , त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे माझीही टीम यावर लक्ष देऊन आहे. असे म्हणत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज हे चुकीचे नव्हते हे समोर आणलं आहे.