वर्षाच्या अखेरीस कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकली आहेत. अशातच बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवलेली स्वीनी खरा हिनेही मोठ्या थाटात लग्न केलेले पाहायला मिळाले. बुधवारी २७ डिसेंबर रोजी स्वीनी खरा बिजनेसमन असलेल्या उर्विश देसाई सोबत विवाहबद्ध झाली. या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो स्वीनी आणि उर्विश या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर मेंदी, हळद सोहळ्याचेही काही खास क्षण तिने तिच्या चाहत्यांना दाखवले आहेत. चिनी कम या चित्रपटाने स्विनीला बालकलाकार म्हणून मोठी लोकप्रियता मिळाली होती. अभिनय क्षेत्र सोडून ती आता वकील झाली आहे. आणि याच क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा मानस आहे.
तर उर्विश देसाई हा इंजिनिअर असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी हे जोडपे प्रिवेडिंग फोटोशूट करण्यासाठी दुबईला गेले होते. अभिनय क्षेत्र सोडून वकिली करणाऱ्या स्विनीने वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. २००५ साली बा बहु और बेबी या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. परिणिता, चिनी कमी, पाठशाला, सीआयडी, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी अशा चित्रपटातून तिला अमिताभ बच्चन सह, शाहिद कपूर, राणी मुखर्जी यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. बालकलाकार म्हणून प्रसिद्धीस आलेली स्वीनी २०१६ साली एम एस धोनी या चित्रपटात शेवटची पाहायला मिळाली. त्यानंतर तिने आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रीत केले.
सध्या ती वकिली करत आहे. बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे जाऊन आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण आजवरच्या इतिहासात बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळणारे कलाकार मोठेपणी मात्र काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करत असतात क्वचितच काही कलाकारांना हे यश मिळवता येते. त्यामुळे स्विनीने वकिली करण्याचा घेतलेला हा निर्णय अगदी योग्यच आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान स्विनीच्या लग्नानंतर तिच्यावर आणि उर्विशवर सेलिब्रिटी विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.