अभिनेत्री मयुरी वाघ ही अबोली मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. जवळपास दीड वर्ष काम नसल्याने ती खूप खचली होती. घटस्फोट घेतल्यानंतर मयुरीने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पण या कठीण काळाने तिला खूप काही शिकवलं असं ती सांगते…”कठीण काळात माणसं ओळखायला शिकले. अशा वेळी कलेत स्वतःला गुंतवून ठेवलं… त्या दिवसांत मी डूडल, मंडाला सारखे आर्टफॉर्म शिकले…कलाक्षेत्रात काम करत असलेले जवळचे लोक संपर्कात असूनही माझ्या कठीण काळात लोक पाठीशी उभे राहिले नाही. तेव्हा आपली माणसं कोण आणि परकी कोण हेही समजलं.
मात्र आता अबोली मालिकेचा नवीन प्रोमो दिसल्यावर तेच लोक पुन्हा माझ्या संपर्कात आले. माझी ही भूमिका थोडीशी मवाळ आहे. मी पुन्हा अगोदरसारख्या भूमिका कराव्यात अशी चाहत्यांची ईच्छा असते. पण मधल्या काळात मला काम मिळत जरी असलं तरी ऐनवेळी त्याजागी दुसऱ्या कोणाला कास्ट केलं जायचं. आता अबोली मालिकेतून मी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. प्रेक्षक माझ्या या भूमिकेवर नक्कीच प्रेम दाखवतील अशी आशा आहे.”
मयुरी ही मूळची डोंबिवलीची. तिने साइड डान्सर आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वचन दिले तू मला या स्टार प्रवाह वरील मालिकेतून तिने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. झी मराठीवरी अस्मिता या मालिकेत तिने डिटेक्टिव्ह अस्मिताची भूमिका गाजवली होती. ग्लो अँड लव्हली, टपरवेअर, हार्पिक, डाबर च्यवनप्राश आणि मॅग्नम आइस्क्रीम यांसारख्या जाहिरातींमध्ये देखील ती झळकली आहे. ती हाऊसफुल आणि सुगरण आणि मेजवानी परिपूर्णा किचन सारख्या रिऍलिटी शोमध्ये तिने सूत्रसंचालन केले होते.