कॉलेजमध्ये असताना मला कबड्डीचे वेड होते मी लग्न केलं नाही…मी माझं वय लपवायचे वडील भाऊ गेल्यानंतर
फँड्री, सैराट, न्यूड अशा मराठी चित्रपटातून काम केल्यानंतर अभिनेत्री छाया कदम यांना मराठी इंडस्ट्रीत वेगळ्या धाटणीची अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. झुंड, गंगुबाई काठियावाडी, हलाल, केसरी अशा हिंदी चित्रपटासाठीही तिच्या नावाची विचारणा झाली. मराठी इंडस्ट्रीत ज्या धाटणीच्या भूमिका त्यांनी निभावल्या त्या भूमिकेसाठी त्यांचे वेळोवेळी कौतुक देखील करण्यात आले. हिंदी सृष्टीत त्यांच्या कामाची दखल अमिताभ बच्चन यांनी देखील घेतली. पण मराठी सृष्टीत म्हणावे तसे कौतुक झाले नाही अशी एक खंत त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. जवळच्या व्यक्तींकडून कामचं कौतुक होतं पण कदाचित काही जणांना माझ्याकडून अजून जास्त चांगल्या कामाची अपेक्षा असावी म्हणून ते कौतुक झालं नाही असे त्या बिनधास्तपणे सांगताना दिसतात.
या मुलाखतीत छाया कदम यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यबद्दलही भरभरून बोललं आहे. मूळच्या कोकणातल्या असलेल्या छाया कदम आपल्या आईवडील आणि भावासोबत मुंबईला राहत होत्या. सर्वसाधारण कुटुंबात त्यांचे पालनपोषण होत होते. कॉलेजमध्ये असताना छाया कदम यांना कबड्डी चे वेड होते, तासंतास त्या या खेळात रममाण होत असत. मात्र अशातच २००१ साली वडिलांचे निधन झाले त्यापाठोपाठ भावाचेही निधन झाले त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली होती. अशातच आईची स्मृतीही गेली. वडील आणि भावाच्या निधनानंतर खचलेल्या छाया कदम अनेक दिवस घराबाहेरच पडत नव्हत्या. पण आसपासच्या लोकांनी त्यांची समजूत घातली आणि काहीतरी काम करण्याची प्रेरणा दिली. त्यावेळी छाया कदम यांनी वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेची जाहिरात पेपरमध्ये वाचली होती. तेव्हा आपण ऍक्टिंग वर्कशॉप जॉईन करायचं असा निर्णय घेतला. ऍक्टिंग वर्कशॉपनंतर बराच काळ स्ट्रगल केल्यानंतर छाया कदम यांना एका शॉर्टफिल्ममध्ये काम मिळाले. शशांक शेंडे, नागराज मंजुळे, रवी जाधव अशा कलाकारांची त्यांना साथ मिळत गेली तसतसा अभिनय क्षेत्रातला यशाचा मार्ग त्यांना खऱ्या अर्थाने गवसलेला पाहायला मिळाला.
छाया कदम आईच्या खूप जवळ असायच्या. आईला विस्मृती झाल्याने लॉकडाऊनच्या काळात तिला अधिक जाणून घेण्याची त्यांना संधी मिळाली. आज आई नाही पण तिच्या आठवणी कायम माझ्यासोबत आहेत असे त्या म्हणतात. मी लग्न केलं नाही, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती असे त्या सांगतात. इंडस्ट्रीत काम करताना मला अनेकजण माझ्या वयाबद्दल विचारायचे तेव्हा मी सगळ्यांना माझं वय कमी सांगायचे. पण हे खोटं सांगत असताना मी अनेकदा माती खाल्लीये असे त्या मिश्कीलपणे कबुली देतात. कारण वय कमी सांगण्याच्या भानगडीत त्या जन्माचे वर्षात कोणते यात गोंधळ करायच्या. पण असं खोटं बोलत राहण्यापेक्षा जे खरं आहे ते सांगून टाकलेलं बरं असे म्हणत त्यांनी वयाबाबत खोटं बोलण्याची ही सवय मोडून टाकली. छाया कदम यांनी लग्न का केले नाही किंवा त्या कोणाच्या प्रेमात पडल्या नाहीत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणतात की, मी रोजच नव्याने प्रेमात पडत असते. जसजस वय बदलत जातं तसतसं ते प्रेम बदलत जातं. मी प्रत्येक गोष्टीवरच, व्यक्तीवरच प्रेम करत असते. फक्त ते प्रेम बॉयफ्रेंडवरच असतं असं नाही कॉलेजमध्ये होते तेव्हा मी कबड्डीच्या प्रेमात होते. ह्याच्याशी लग्न करायचं असं म्हणून मी कधीच प्रेमात पडले नाही पण मी माझ्या मैत्रिणी, सहकलाकार आहेत त्यांच्या प्रेमात पडले आहे. मी प्रेमात पडते आणि आयुष्यभर प्रेमात पडत राहील असे म्हणत त्यांनी यावर एक मिश्किल उत्तर दिलेले पाहायला मिळाले.