मराठी असून ही मराठी भाषेवर आक्षेप घेतला लाथ मारली धमकावलं … प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ट्रेनमध्ये आला धक्कादायक अनुभव
सर्वसामान्य मराठी कलाकार हा बऱ्याच संघर्षानंतर या इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होताना दिसतो. अर्थात त्यांचा हा स्ट्रगल सहजसोपा नसल्याने अनेक खाचखळगे त्यांना पार करावे लागतात. नुकतेच अभिनेत्री अश्विनी कासार हिने स्वतःच्या हक्काचं घर मिळवलं आहे . काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या या नवीन घरात गृहप्रवेश करताना आपल्या स्ट्रगल बद्दल भावनिक पोस्ट शेअर केली होती. पण कामासाठी बाहेर जाताना अजूनही तिला सार्वजनिक वाहनाने प्रवास करावा लागतो. नुकत्याच एका प्रवासात तिला एक वाईट अनुभव मिळाला आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना अश्विनीने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अश्विनी ट्रेनने प्रवास करताना दिसत आहे. पण तिच्या समोर ठाण मांडून बसलेली एक महिला प्रवासी स्वतःच्या गुर्मीतच असलेली दिसून आली. त्या महिला प्रवासिने अश्विनी कासार सोबत हुज्जत घातली.
आणि ती बसलेल्या सीटवर पाय ठेवून बसली. या बद्दल अश्विनी सांगते की, “या बाईच नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेऊन बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्यांच्याशीही प्रॉब्लेम होता. मी पब्लिक इमेज आहे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.” असे म्हणत अश्विनीने या घटनेत रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलिसांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बऱ्याचदा परप्रांतीय हिंदी भाषेवर अडून राहतात. महाराष्ट्रात त्यांची ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही असे अनेक दाखले देणारे प्रकार वारंवार घडत असतात. अश्विनी कासार हिला आलेला हा अनुभव देखील निंदनीयच म्हणावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी तर या घटना कित्येकदा पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी मीडियाच्या माध्यमातून एका वार्ताहर महिलेला असाच अनुभव आला. निवडणुकीत कोण जिंकेल असा तिचा प्रश्न होता तेव्हा पानटपरी चालवणारा परप्रांतीय तिच्याशी हुज्जत घालू लागला.
मला मराठी समजत नाही हिंदीतून बोला असे तो वारंवार म्हणाला तेव्हा त्या मुलाखत घेणाऱ्या महिलेने तिथल्या तिथे त्याचा समाचार घेतला आणि मी मराठीतच बोलणार असे म्हणत तिथून काढता पाय घेतला. पण अश्विनी सोबत वाईट कृत्य करणारी व्यक्ती ही मराठीच असल्याचे तिने खुलस्यात म्हटले आहे. अश्विनीने शेअर केलेल्या या घटनेचा परप्रांतीय लोकांशी संबंध जोडण्यात आला आहे तेव्हा तिनेच पुढे येऊन याबद्दल खुलासा करताना म्हटले आहे की, “काल ट्रेनमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मी रीतसर पोलीस कम्प्लेन्ट केलेली आहे. त्यासाठी दादर पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम सहकार्य केले आहे. आता पुढील प्रकियेसाठी तक्रार कल्याण jurisdiction कडे पाठवण्यात येईल. खूप जणांनी मेसेजेस कॉल्स करून चौकशी केली. त्याबद्दल धन्यवाद! रेल्वे पोलिसांचे आभार. ( काही जणांना ती व्यक्ती अमराठी आहे असं वाटत आहे. ती व्यक्ती मराठीच होती. English मध्ये भांडण करत होती. कृपया चुकीची माहिती पसरवू नये). “असेही अश्विनीने माहितीत खुलासा केला आहे.