त्या मुलीची ती अवस्था पाहून यशवंत दत्त झोळी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागले … पत्नी आणि मुलाने सांगितला तो किस्सा
मराठी सृष्टीत काही देखणे नायक होऊन गेले त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते यशवंत दत्त. यशवंत दत्त यांनी नाटक, चित्रपटातून नायक म्हणून यशाची शिखरे गाठली. केवळ नायकच नाही तर त्यांनी खलनायक सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा केला होता. वैजयंती साळुंखे सोबत यशवंत दत्त यांनी प्रेमविवाह केला होता. मराठी चित्रपट दिग्दर्शक अक्षय दत्त हा त्यांचा एकुलता एक मुलगा. यशवंत दत्त हे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. ते शूटिंगमध्ये कायम व्यस्त असायचे त्यामुळे त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नसे, पण जेव्हा कधी ते घरी यायचे तेव्हा मात्र ते पत्नी, मुलांसोबत चित्रपट, नाटक पाहायला आवडीने जायचे. लोकांच्या ते कायम मदतीला धावून जायचे. अनेक संस्थांना त्यांनी देणगी दिलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक संस्थांनी एक दिवस कामकाज बंद ठेवून दुखवटा पाळला होता. यशवंत दत्त यांची एक खास आठवण अशी की एक दिवस ते झोळी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागले.
याचा किस्सा सांगताना मुलगा अक्षय म्हणतो की, ” बाबा हे कामानिमित्त मुंबईला असायचे, मालाडला एक घर होतं पण ते जास्त करून रविंद्र नाट्यमंदिरातच असायचे. एका रात्री एक व्यक्ती रविंद्रच्या पायऱ्यावर बसुन रडत होता. बाबांनी त्याला जवळ जाऊन विचारलं तर त्याने त्याच्या मुलीच्या हृदयाला होल असल्याचं सांगितलं. तिच्या ऑपरेशनला खूप मोठा खर्च येणार असल्याने ते रडत होते. बाबा त्या व्यक्तीला म्हणाले होते की मी पण एवढा काही मोठा माणूस नाही पण मला तुझा पत्ता देऊन ठेव. त्या रात्री बाबांनी काय विचार केला माहीत नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पाटीवर ‘एका चिमण्या जीवासाठी’ अशी एक कवीता लिहिली. आपल्या या प्रसिध्दीचा कोणालातरी फायदा करून देता येईल म्हणून ती पाटी आणि सोबत झोळी त्यांनी गळ्यात घातली आणि उदय काकाला झोळी पुढे करून पहिली भीक मागितली. उदय काकांनी हे तू काय करतोय असं म्हणत न राहवून त्यात ५० रुपये टाकले त्यानंतर बाबा पुढच्या दुकानाकडे गेले.
दादरच्या रस्त्यावर, रेल्वेस्टेशन सगळीकडे ते झोळी घेऊन भीक मागु लागले आणि लोकांनी ते दिलेही. रात्रीपर्यंत जमा झालेले सगळे पैसे घेऊन बाबा त्या व्यक्तीच्या घरी गेले आणि झोळी रिकामी केली. हे पैसे मोज आणि मुलीचं ऑपरेशन कर म्हणून सांगितलं तेव्हा त्यात जवळपास ४० हजार रुपये जमा झाल्याचे सांगितले. त्या व्यक्तीला ३५ हजारांची गरज होती, तुम्हाला द्यायला आमच्याकडे असं काही नाही असे तो व्यक्ती म्हणाला तेव्हा बाबांनी त्यातला एक रुपया घेत ‘एवढं पुरेसं आहे’ असे म्हटले. पुढे त्या ऑपरेशनचा खर्च वाढला तेव्हा बाबांनी काही नाटकाचे प्रयोगही केले. अक्षय दत्त याने ही मुलाखत सुलेखा तळवलकर यांच्या युट्युब चॅनलला दिली आहे. वडिलांच्या अनेक गोड आठवणी त्याने इथे शेअर केल्या आहेत.