news

ठकास महाठक चित्रपट अभिनेत्री शलाका आता दिसते अशी…मराठीची नितु सिंग म्हणून मिळवली ओळख

गेल्या काही दिवसांपासून बोलक्यारेषाच्या माध्यमातून काळाच्या ओघात पडद्यामागे गेलेल्या कलाकारांची ओळख नव्याने करून दिली जात आहे. या उपक्रमाला तुम्हा रसिक प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक दोन किंवा काही मोजके चित्रपट करून अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेले पण तरीही प्रेक्षकांच्या स्मृतीत राहिलेले हे कलाकार कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा जाणून घेण्याची संधी या माध्यमातून केली जात आहे. तेव्हा आज अशाच एका अभिनेत्रीची ओळख करून घेणार आहोत जिने या इंडस्ट्रीत ‘शलाका’ नावाने स्वतःची ओळख मिरवली होती. या अभिनेत्रीची आणखी एक ओळख म्हणजे त्या दिसायला अगदी हिंदी चित्रपट अभिनेत्री नितु सिंग म्हणजेच आताच्या नितु कपूर सारख्या सेम दिसत होत्या. त्यामुळे त्यांना मराठीची नितु सिंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते. ठकास महाठक हा १९८४ सालचा गाजलेला चित्रपट.

ashok saraf with actress seena dharadhar shalaka
ashok saraf with actress seena dharadhar shalaka

या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेच्या भूमिकेत शलाका दिसल्या होत्या. ‘आज पांघरु नशा धुक्याची…’ हे रोमँटिक गाणं दोघांवर चित्रित झालं होतं. या चित्रपटामुळे अभिनेत्री शलाका प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. खरं तर ८० च्या दशकातली नायिका म्हणून त्या आज ओळखल्या जातात. या चित्रपटा अगोदर त्यांनी नणंद भावजय, मायबाप, आपलेच दात आपलेच ओठ, घर जावई, आटापिटा, शरण तुला भगवंता चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. नणंद भावजय चित्रपटातील ‘ चंपा चमेली की जाई अबोली…’ हे गाणं पद्मश्री जोशी कदम आणि शलाका यांच्यावर चित्रित झालं होतं. शलाका यांचं आताचं नाव आहे ‘सीना धराधर’. शलाका याच नावाने त्यांनी मराठी इंडस्ट्रीत ओळख बनवली होती. चित्रपटातील त्यांची इमेज अगदी नितु सिंग यांच्यासारखीच दिसत असल्याने त्या मराठीची नितु सिंग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्या या इंडस्ट्रीतून बाजूला जाऊन आज बरीच वर्षे लोटली आहेत . त्यामुळे त्या आता काय करतात आणि कशा दिसतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

Seena Dharadhar marathi actress with family
Seena Dharadhar marathi actress with family

शलाका म्हणजेच सीना धराधार यांचे बालपण मुंबईतील वांद्रे येथे गेलं. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नाटकातून काम केले. चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सीना धराधार यांनी पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगीही आहे. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून आता त्या आपल्या गोड नातीसोबत वेळ घालवताना दिसतात. मुंबईतील जोगेश्वरी भागात त्या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. आजही त्या तेवढ्याच उत्साही आणि सुंदर दिसतात हे विशेष. अभिनय क्षेत्रात त्या पुन्हा दाखल झाल्या तर प्रेक्षकांनाही ते निश्चितच आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button