मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल २७ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘तिकिटालय’ हे ऍप लॉन्च करण्यात आले. १५ मार्चपासून या ऍप मार्फत मराठी मनोरंजन कार्यक्रमाची तिकिटं तुम्हाला घरबसल्या बुक करता येणार आहेत. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. अशोक सराफ, महेश कोठारे, सुकन्या कुलकर्णी, प्रशांत दामले, संजय मोने, संकर्षण कऱ्हाडे, सुयश टिळक, संकर्षण कऱ्हाडे, हर्षदा खानविलकर असे मान्यवर कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यावेळी संकर्षण कऱ्हाडे मंचावर आल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला की, ” आता मंचावर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी चंद्रकांत कुलकर्णी सर इथे आले होते आणि चं कु सर जेव्हा बोलतात तेव्हा बोलता बोलता असं काही सांगून जातात की त्यातून खूपच मोठ सार काहीतरी सांगून जातात.” संकर्षणच्या या बोलण्याचा मुद्दा हेरून राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात संकर्षणचे कानच पिळलेले पाहायला मिळाले.
भाषण सुरू करताना सुरुवातीला राज ठाकरे यांनी अशोक सराफ सर, महेश कोठारे सर, प्रशांत दामले सर असा मान्यवरांचा नावापुढे सर म्हणत उल्लेख केला. याअगोदर राज ठाकरे यांनी नाट्यसंमेलनाच्या वेळी ‘आपल्या कलाकारांना आपणच आदर दिला पाहिजे’ असे म्हटले होते. त्याला अनुसरूनच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि संकर्षणच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला , “संकर्षणजी त्या दिवशी नाट्यसंमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर चंकु सर असं काही नसतं. ते चंद्रकांत कुलकर्णी सर असं असू शकतं. पण मला असं वाटतं की आपणच या काही गोष्टी सुधारल्या पाहिजेत. ” असे म्हणत राज ठाकरे यांनी संकर्षण कऱ्हाडेची ही चूक लक्षात आणून दिली. आणि यापुढे आता अशा चुका घडून येणार नाहीत अशीही अपेक्षा व्यक्त केली.
टोपणनावाने कलाकारांना संबोधल्याने त्यांचा आदर आपणच कमी करतो ही बाब राज ठाकरे यांनी सर्व कलाकारांच्या लक्षात आणून दिली होती. दाक्षिणात्य कलाकारांचा या बाबतीतील आदर्श आपण घ्यायला हवा असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. मामा, अंड्या, पॅडी ही अशी नावं तुम्ही एकमेकांसाठी वापरत असाल तर प्रेक्षक त्यांचा आदर कसा करतील हा महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून दिला होता. या गोष्टीवर आता विचार होऊ लागल्याने मराठी कलाकारांमध्ये हळूहळू बरेचसे बदल घडून आलेले पाहायला मिळत आहेत.