
कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पाच मैत्रिणीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गमतीजमती या मालिकेत पाहायला मिळत आहे.आज महाएपीसोडमध्ये एका पात्राची एन्ट्री होत आहे. ही भूमिका अभिनेता पार्थ केतकर साकारत आहे. पार्थ केतकर याने लहान असताना अवंतिका मालिकेतून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्याचे वडील प्रसन्न केतकर हे देखील प्रसिद्ध अभिनेते आहेत. प्रसन्न केतकर यांनी हिंदी, मराठी मालिका सृष्टीत अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मुलगा पार्थने अवंतिका या लोकप्रिय मालिकेतून बालपणीच्या तेजसची भूमिका साकारली होती. वयाच्या चौथ्या वर्षी तो टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अवंतिका मालिकेनंतर पार्थने पिंपळपान, रेशीमगाठी या मालिकेत सुद्धा बालकलाकार म्हणून काम केले होते. प्रेरणा एक कला मंच या नाट्यसंस्थेशी जोडल्यानंतर राज्य नाट्य स्पर्धांमधून सहभाग दर्शवताना दिसला. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक अशा नाट्यस्पर्धा त्याने गाजवल्या आहेत.

गोंदया आला रे, गब्बर आज बॅक, सनी, चारचौघी अशा नाटक, मालिका, चित्रपटातून पार्थने सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल झालेल्या पार्थला हळूहळू या इंडस्ट्रीत यश मिळू लागले आहे. गेल्या वर्षी मानसी नातू सोबत त्याचे थाटात लग्न पार पडले होते. चारचौघी या नाटकानंतर आता तो पुन्हा एकदा मालिकेत काम करतो आहे. या नवीन भूमिकेसाठी पार्थला मनःपूर्वक शुभेच्छा!.