झपाटलेला या चित्रपटाचा तिसरा भाग पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे यांनी आपल्या या आगामी चित्रपटाची घोषणा करताना पहिले पोस्टर लॉन्च केले होते. झपाटलेला चित्रपटाच्या यशानंतर त्याचा दुसरा सिकवल काढण्यात आला मात्र या दुसऱ्या सिकवलला प्रेक्षकांनी खूप कमी प्रतिसाद दिला. अर्थात यामध्ये सगळ्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिस केले होते. पण झपाटलेला ३ मध्ये तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे पाहायला मिळणार असे आश्वासन स्वतः महेश कोठारे यांनी दिले आहे. हे प्रत्यक्षात शक्य नसले तरी एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील असे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मीकांत आणि महेश या जोडीशिवाय कुठलाही चित्रपट अपूर्णच ठरेल. मला या चित्रपटात लक्ष्मीकांत हवा आहे आणि म्हणून मी AI या तंत्रज्ञानाचा वापर करुन लक्ष्याला आणणार असे स्पष्टीकरण महेश कोठारे यांनी दिले होते.
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीला मिळतील असा एक विश्वास त्यांना वाटत आहे. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. नुकतेच अभिनय बेर्डे याने ‘आज्जीबाई जोरात’ या महाबालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना झपाटलेला ३ चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार याबद्दल त्याने एक वक्तव्य केलं आहे. अभिनय म्हणतो की, “AI त्यांची इमेज आणू शकतो त्यांचा आवाज आणू शकतो पण त्यांचा टायमिंग नाही आणू शकत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खरा अनुभव या माध्यमातून तुम्ही नाही देऊ शकत .त्यासाठी तुम्हाला त्यांचे जुने चित्रपटच बघावे लागतील. पण मला असं वाटतं की ए आय कशाप्रकारे आणलं जातं आणि ते कशा प्रकारे दाखवलं जातं यागोष्टीवर ते निर्भर करतं.
पुढच्या दहा वर्षात कळेल की AI आपण कितपत वापरू शकतो आणि त्याचे लिमिट्स कुठपर्यंत आहेत . आपल्या बुद्धीला पर्यायच नाहीये , A I त्यासाठी पर्याय म्हणून नाहीये , ते एक कंपोनंट आहे जे तुमच्यासाठी ते आहे तुम्ही त्याच्यासाठी नाही आहात.” अभिनयाच्या या वक्तव्यावरूनच तो A I चयक वावरावर साशंक आहे. लक्ष्मीकांत यांना खरं पाहायचं असेल तर त्यांचे जुने चित्रपटच पाहून ती मजा अनुभवता येईल. पण या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना पुन्हा कसं आणलं जातंय यावर ते अवलंबून असणार आहे. लोकांना ते पहायला आवडेल की नाही हे आता चित्रपट आल्यानंतरच स्पष्ट सांगता येईल असेच मत त्याने व्यक्त केलं आहे.