मराठी बिग बॉसनंतर लवकरच हिंदी बिग बॉसची घोषणा होणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हिंदी बिग बॉसचा १८ वा सिजन सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये अनेकदा मराठी कलाकारांना संधी देण्यात आली आहे. शिव ठाकरे, मेघा धाडे, अभिजित बिचुकले, तेजस्वी प्रकाश, शिल्पा शिंदे अशा मराठी सेलिब्रिटींनी याअगोदर हिंदी बिग बॉस गाजवलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे यंदाचा १८ वा सिजनही मराठी प्रेक्षकांसाठी खास ठरणार असे बोलले जात आहे. कारण या शोमध्ये सहभागी होण्यासाठी एका आघाडीच्या नायिकेला विचारणा करण्यात आली आहे. सध्या आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांची चांगली लोकप्रियता मिळवत आहे.
याच मालिकेची अभिनेत्री बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेत आहे. आई कुठे काय करते मालिकेतील ही अभिनेत्री आहे संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले. रुपाली भोसले हिच्या विरोधी अभिनयाने आई कुठे काय करते मालिका चांगलीच गाजली आहे. मालिका सृष्टीतील देखणी खलनायिका म्हणून तिने लोकप्रियता मिळवली आहे. पण आता रूपालीला हिंदी बिग बॉसकडून ऑफर मिळाली आहे. १८ व्या सिजनमध्ये सहभागी होण्यासाठी बिग बॉसच्या टीम कडून संपर्क करण्यात आला आहे. निकटवर्तीयांकडून ही खात्रीशीर माहिती देण्यात आल्याने रुपाली लवकरच मालिकेला निरोप देणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी रुपालीने तिचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ठाण्यात तिने घेतलेल्या या घरात काही दिवसांपूर्वीच गृहप्रवेश केला होता. एवढ्या वर्षांचा अभिनय क्षेत्रातला खडतर प्रवास अनुभवणाऱ्या रुपालीचं हे स्वप्न सत्यात उतलेलं पाहून खूप कौतुक झालं होतं. हा आनंद अजून ताजा असतानाच तिला बिग बॉसची ऑफर आली आहे. त्यामुळे रुपालीचा आनंद द्विगुणित झाला असणार आहे. दरम्यान रुपाली हिंदी बिग बॉसची ही ऑफर स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संजनाचे पात्र साकारण्यासाठी आता दुसऱ्या एका नायिकेची निवड करण्यात येणार आहे. सुरुवातीला दीपाली पानसरे हिने या मालिकेत संजनाचे पात्र साकारलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर रुपालीने या पात्राची धुरा सांभाळलेली पाहायला मिळाली. पण आता रुपाली या पात्राला निरोप देणार असून या भूमिकेसाठी नवीन खलनायिका शोधावी लागणार आहे. पण यामुळे मालिकेचे प्रेक्षक रुपालीला खूप मिस करतील.