
गेल्या काही दिवसांत झी मराठीवरील मालिकांमधून एक वेगळाच ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. दोन मालिका एकत्र आणून एक वेगळंच कथानक सुरू करून या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या जात आहेत. त्यात पारू आणि सावळ्याची जणू सावली मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. पारू मालिकेत पारूची सुटका करण्यासाठी आदित्य पुरेपूर प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीवर नवीन संकट कोसळणार आहे. या दोन्ही मालिकेचा खलनायक विश्वंभर ठाकुरची लवकरच एन्ट्री होत आहे.

विश्वंभर ठाकूर हे पात्र लवकरच मालिकेत एन्ट्री घेत आहे. सोहमचे लग्न कियारा ठाकूर सोबत व्हावे म्हणून हा विश्वंभर त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन तिलोत्तमाकडे येतो. ही भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना पडला होता. तो अभिनेता म्हणजेच नागेश भोसले असल्याचा उलगडा आता झाला आहे. नागेश भोसले हे खलनायकाच्या भूमिकेसाठी विशेष ओळखले जातात. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नागेश भोसले यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. देवयानी, अग्निहोत्र, चांदणे शिंपित जाशी अशा अनेक मालिकांमधून त्यांनी विविधांगी भूमिका गाजवल्या आहेत. गेल्या काही वर्षात ते चित्रपटात तसेच हिंदी मालिकांमध्ये सक्रिय होते. पण आता सावळ्याची जणू सावली आणि पारू मालिकेतून पुन्हा एकदा ते खलनायक साकारताना दिसणार आहेत.

नागेश भोसले यांच्या पत्नी जॉय भोसले या निर्मात्या आहेत. ‘जॉय कलामंच’ या त्यांच्या निर्मिती संस्थेतून त्यांनी कळत नकळत, पाऊले चालती पंढरीची वाट या नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्या ओळखल्या जातात. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. तर त्यांची मुलगी कुहू भोसले ही वुमन्स बॉडिबिल्डर म्हणून ओळखली जाते.