आज २१ जानेवारी रोजी मराठी सृष्टीतील एक बहुचर्चित लग्न थाटात पार पडलं. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुले अर्थात अंबानीच्या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. तीन दिवसांपासून सुरू असलेला हा लग्नसोहळा आज अखेर पुण्यात म्हाळुंगे परिसरात पार पडला. शिवानी सोनार ही मूळची चिंचवडची त्यामुळे लग्नासाठी तिने जवळचे ठिकाण निवडले. म्हाळुंगे येथील ‘इकोविले फार्म’ मध्ये निसर्गाच्या सानिध्यात आज या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. शिवानीने लग्नात हिरवी साडी नेसावी, कपाळावर चंद्रकोर असावी अशी अंबरची ईच्छा होती.
त्यानुसार शिवानीने हिरव्या रंगाची पैठणी लग्नात नेसली होती. हे लग्न विधिवत दोन पद्धतीने पार पडले. विशेष म्हणजे शिवानीने तिच्या लग्नात आजीच्या आईची नथ नाकात घातली होती. ही नथ जुनी झाल्यामुळे लग्नाअगोदर तिने नथीला नवीन लूक दिला होता. लग्नात आजीच्या आईची नथ नाकात घालायची असा तिचा अट्टाहास तिने उरण करून घेतला. आज म्हाळुंगेत पार पडलेल्या शिवानी आणि अंबरच्या लग्नाला अभिनेता सुमित पुसावळे याने हजेरी लावली होती. रंग माझा वेगळा मालिकेचे कलाकार हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल, रेश्मा शिंदे यांनीही हजेरी लावली.
तर शिवानीची पहिली वहिली मालिका राजा राणीची गं जोडी मालिकेतील कलाकार गार्गी फुले कुटुंबासह लग्नाला दाखल झाल्या. अभिनेत्री शुभांगी गोखले याही यावेळी उपस्थित राहिल्या होत्या. याशिवाय तू भेटशी नव्याने मालिकेतील अभिनेता सुबोध भावे याने पत्नी मंजिरी भावेसह शिवानी अंबरच्या लग्नात हजेरी लावली. दुर्गा मालिकेतील अभिनेत्री रुमानी खरे, नम्रता प्रधान या सेलिब्रिटींनीही लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली.