बस आता मी ऐतिहासिक चित्रपट करणार नाही…या कारणामुळे फुलवंती चित्रपटावेळी गश्मीरची व्हायची चिडचिड
गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला एक राधा एक मीरा हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानिमित्त गश्मीर, मृण्मयी मीडिया माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. अशाच एका प्रमोशन दरम्यान गश्मीरने ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी कंटाळा आलाय असे म्हटले आहे. आता किमान काही वर्षे तरी अशी भूमिका नको असे तो म्हणतो आहे. फुलवंती चित्रपटामुळे त्याला हा अनुभव आल्याचे तो सांगतो. अर्थात फुलवंती मध्ये गश्मीरने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली होती, या भूमिकेचे तेवढे कौतुकही झालेले पाहायला मिळाले. पण ही भूमिका साकारताना खूप मेहनत घ्यावी लागल्याचे तो सांगताना दिसतो. अर्थात ऐतिहासिक चित्रपट करणार नाही असे तो गमतीत म्हणताना दिसत आहे.
त्याचे कारणही त्याने यावेळी सांगितलेले पाहायला मिळाले. ” मला ना आता कंटाळा आलाय की ती सगळी वस्त्र परिधान करणे , ते दागिने घालणे. मी प्रत्येक वेळेस ते दागिने काढून त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन आपटायचो आणि म्हणायचो की हे एवढे दागिने का घालायचेत?…एवढा वेळ कसा होता यांच्याकडे , महापंडितांकडे वगैरे?…ही एवढी जड कडी का घालतात हे लोक, एवढ्या ५-५ अंगठ्या का घालतात?…त्यामुळे आता ना मी ऐतिहासिक सिनेमा काही वर्षे करणार नाही…एक राधा एक मीरा मध्ये माझा किती छान लूक आहे ना!…१ टी शर्ट घातला, जिन्स घातली आणि शूज घेतले की झालो रेडी…मी चित्रपट चुज करताना चित्रपटाचं बजेट किती आहे ते अगोदर विचारतो.
कारण तुम्ही जे बनवताय ते त्यात बनेल ना असा माझा पहिला प्रश्न असतो.माझं एवढंच म्हणणं असतं की मी अगोदर काय केलंय यापेक्षा माझ्या बॅगेज घेऊन नाही येणार तू अगोदर काय केलंस त्याचही सेटवर बॅगेज घेऊन नाही यायचंस…”. गश्मीर त्याच्या या स्पष्टीकरणातच सुचवत आहे एक साधी सुधी दिसणारी भूमिका त्याला करायची आहे. खूप सगळा मेकअप, भरपूर दागिने, भरजरी कपडे असं सगळं करण्यात खूप वेळ जातो. हे सगळं का घालायला लागतंय? त्यामुळे त्याची चिडचिड झाली होती.