
प्रसिद्धीच्या झोतात असलेले कलाकार अचानक गायब झाले तर त्यांच्याबद्दल चौकशी केली जाते. अर्थात वृद्धापकाळाने किंवा काम न मिळाल्याने हे कलाकार इंडस्ट्रीपासून बाजूला झालेले दिसतात. मात्र काही कलाकार कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला तोंड देऊन गायब झालेले दिसून आले. शरद पोंक्षे, विजय कदम, अतुल परचुरे असो किंवा विद्याधर जोशी असो या कलाकारांच्या बाबतीत असलेले आजारपण प्रेक्षकांना समजले आणि त्यांना या आजारातून बरे वाटावे म्हणून देवाजवळ प्रार्थनाही केली. दुर्दैवाने विजय कदम, अतुल परचुरे सारखे कलाकार प्रेक्षकांनी गमावले. पण मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेले विद्याधर जोशी आता पुन्हा एकदा कम बॅक करताना दिसत आहेत. गेले दोन अडीच वर्षे विद्याधर जोशी एका गंभीर आजाराला तोंड देत होते. कोरोनाकाळात त्यांना अनेक त्रास जाणवू लागले.
पण उपचार घेऊनही आजाराचे निदान होत नव्हते. एका तपासणी नंतर त्यांना फुफ्फुसाचा फायब्रॉसिस हा आजार झाल्याचे लक्षात आले. पण यावर उपचार नसल्याने डॉक्टरही काही उपाय करू शकत नव्हते. पण आता या आजारावर मात करून विद्याधर जोशी वेड लागलं प्रेमाचं या स्टार प्रवाहवरील मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. विद्याधर जोशी यांना फुप्फुसातील फायब्रॉसिस हा दुर्धर आजार झाला होता. सतत दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे यामुळे ते त्रस्त होते. एका महिन्यातच त्यांचा हा आजार वाढत जाऊन ६० टक्के फुफ्फुस निकामी झाले होते. तेव्हा डॉक्टरांनी फुफ्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. जीवाची होतीया काहिली मालिकेतून ते या आजारपणामुळे अचानक बाजूला झाले होते.

तेव्हा ते मालिकेतून का बाहेर पडले अशी चर्चा पाहायला मिळाली होती. शेवटी फुफ्फुस प्रत्यारोपण ही खर्चिक शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात आली. गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या एका नातेवाईकाने ही शस्त्रक्रिया केली होती, त्याबद्दल योग्य ती माहिती घेऊन विद्याधर जोशी या शस्त्रक्रियेसाठी तयार झाले. सुरुवातीला खूप खर्च लागणार असल्याने माझ्यावर एवढे पैसे खर्च का करता असा त्यांचा घरच्यांना प्रश्न होता. पण पत्नीच्या सनजवण्यानंतर ते तयार झाले. आता आरोग्य सुस्थितीत जानवल्याचे पाहून त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.