
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन एक सोहळा साजरा केलेला पाहायला मिळाला. हा सोहळा होता मालिकेची अभिनेत्री मोनिका दबडे हिच्या डोहळजेवणाचा. साधारण २ महिन्यांपूर्वी मोनिका दबडे हिने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी जाहीर केली होती. तेव्हा ती मालिकेतून ब्रेक घेणार अशी चर्चा पाहायला मिळाली. ठरलं तर मग मालिकेत मोनिकाने अस्मिताची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका काहीशी विरोधी जरी वाटत असली तरी तिच्या वेंधळेपणामुळे एक गम्मत पाहायला मिळते. मोनिकाच्या प्रेग्नन्ट असल्याची बातमी समजल्यापासून मालिकेच्या सेटवर तिची व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामुळे या कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं पाहायला मिळतं. त्यांचं हेच बॉंडिंग आता मोनिकाच्या डोहळजेवणातही पाहायला मिळालं आहे. नुकतेच मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन मोनिकाचं डोहळजेवण साजरं केलं.

केतकी विलास, सुचित्रा बांदेकर, प्राजक्ता दिघे, जुई गडकरी, प्रियांका तोंडवळकर, दिशा दानडे यांनी मोनिकाच्या डोहाळजेवणात ‘गं कुणीतरी येणार येणार गं!’…या गाण्यावर ठेका धरला. सोहळ्याचा हा गोड व्हिडीओ या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन डोहळजेवण साजरं करण्याची ही दुसरी वेळ आहे. याअगोदर झी मराठीच्या सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हिचेही डोहळजेवण साजरे करण्यात आले होते. सारं काही तिच्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी एकत्र येऊन हा सोहळा छान साजरा केला. आता मोनिका दबडे हिच्याही बाबतीत असाच काहीसा किस्सा घडला आहे. खरं तर मालिकेची ही तिची सर्वात गोड आठवण असणार हे मात्र नक्की. पण यानंतर मात्र अस्मिताचे पात्र मालिकेतून ब्रेक घेतानाही दिसणार असल्याने सहाजिकच प्रेक्षकांना त्याचे वाईट वाटणार आहे.

मोनिकाने याअगोदर मानसीचा चित्रकार तो, स्वराज्यजननी जिजामाता, चिंतामणी, लव्ह लफडे अशा चित्रपटातून, मालिकेतून काम केले आहे. तर तिचा नवरा चिन्मय कुलकर्णी हाही स्टॅण्डअप कॉमेडीयन आहे. गेल्या वर्षी सहज म्हणून मोनिकाने तिचा युट्युब चॅनल सुरू केला होता. रोजचे रुटीन, रेसिपीज आणि सेटवरची धमाल मस्ती अशा ब्लॉगमुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसली. ठरलं तर मग या मालिकेच्या कलाकारांसोबत तिचे छान बॉंडिंग तयार झाले आहे. आता ती आई होणार या बातमीने सेटवर आनंदाचे वातावरण आहे. पण यामुळे मोनिकाला काही दिवस तरी मालिकेतून ब्रेक घ्यावा लागेल हे वेगळे सांगायला नको.