वर्षाच्या अखेरीस मराठी सृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकलेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच रेश्मा शिंदेचं थाटात लग्न पार पडलं. तर अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुले यांच्याही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. याच्याच जोडीला आई कुठे काय करते मालिकेतील आरोहि खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळणार आहे. नुकतेच आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेत आरोहिची भूमिका अभिनेत्री कौमुदी वालोकर हिने निभावली होती.
गेल्या वर्षी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ रोजी कौमुदीने आकाश चौकसे सोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले होते. साखरपुड्यानंतर आता जवळपास वर्षभराने हे दोघेही लग्न करणार आहेत. नुकतेच या दोघांच्या मित्र मैत्रिणींनी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. ब्राईड टू बी आणि ग्रुम टू बी म्हणत या दोघांनी लग्नाची लगबग सुरू झाल्याचे जाहिर केले आहे. कौमुदी वालोकर हीने शाळेत असल्यापासूनच नाटकातून सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. २०११ साली शाळा या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती.
शटर, मी वसंतराव, तुझ्या माझ्यात, वाय झेड अशा चित्रपटातून कौमुदीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. देवाशप्पथ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. आई कुठे काय करते या मालिकेत ती आरोहिची भूमिका साकारताना दिसली. तर कौमुदीचा होणारा नवरा आकाश चौकसे हा पीएचडी धारक आहे, शिक्षण घेण्यासाठी तो कॅलिफोर्निया येथे गेला होता. आता लवकरच पार पडणाऱ्या त्यांच्या लग्नाला आई कुठे काय करते मालिकेची टीम उपस्थित राहिलेली पाहायला मिळेल.