अप्पी आमची कलेक्टर ही झी मराठी वरील मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. इतके दिवस या मालिकेत एकमेकांच्या कुरघोड्या पाहायला मिळाल्या होत्या. पण आता इथून पुढे मालिकेत प्रेक्षकांना भावूक क्षण अनुभवायला मिळणार आहेत. मालिकेतला खरा स्टार म्हणजेच अमोल उर्फ सिम्बा त्याच्या कठीण काळाला सामोरं जाताना दिसणार आहे. अमोलला दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे. खरं तर अशा चिमुरड्या जीवावर अशी वेळ यायला नको असे अनेकदा प्रेक्षकांकडून बोलण्यात येऊ लागले होते. त्यामुळे हा ट्विस्ट पाहताना अनेकजण भावुक होत आहेत. अमोलची इच्छा होती की आपल्या सगळ्या कुटुंबाने एकत्र यायला हवे त्याने ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
आता त्याच्या कठीण काळात सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला धीर दिला आहे. दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याने अमोलवर केमो थेरपी करण्यात आली. ही प्रोसेस सुरू असताना त्याच्या डोक्यावरचे केस आता गळायला लागले आहेत. यामुळे अमोल घाबरून जाऊ नये म्हणून त्याला धीर दिला जात आहे. अमोलचे नुकतेच केस काढण्यात आल्याने एक वेगळा अमोल या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा हा ट्विस्ट प्रेक्षकांना मात्र भावुक करणारा ठरला आहे. अमोलची भूमिका साइराज मने त्याच्या निरागस अभिनयाने गाजवली आहे. साइराज केंद्रे हा एका रीलमुळे सोशल मीडियावर स्टार बनला होता. पण अप्पी आमची कलेक्टर मालिकेत त्याची एन्ट्री झाली तेव्हा प्रेक्षक पुन्हा या मालिकेकडे वळले.
साइराज केंद्रे मुळे ही मालिका प्रसिद्धीच्या झोतात आली हे त्या मालिकेच्या कलाकारांनीही मान्य केलं आहे. इतके दिवस साइराज त्याच्या हावभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. पण आता त्याचा मालिकेतला हा कठीण काळ चाहत्यांना रडवून जाणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्यात असल्याने हा मोठा ट्विस्ट आणला आहे. शेवटी अमोल कॅन्सरवर मात करणार हे माहीत असूनही प्रेक्षक मात्र त्याला असे पाहून रडवेले होत आहेत. ही त्याच्या सहजसुंदर अभिनयाची एक पावतीच म्हणावी लागेल.