आधी मुक्ताच्या बहिणीची रिप्लेसमेंट आता हर्षवर्धनच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता….प्रेमाची गोष्ट मालिकेत नाना पाटेकरांच्या भाच्याची एन्ट्री
एखादी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उरलेली असते तेव्हा प्रेक्षकांची त्या कलाकारांसोबत आपुलकी निर्माण होते. पण जेव्हा अचानकपणे मालिकेच्या कलाकारांना रिप्लेस केलं जातं तेव्हा ती लिंक कुठेतरी तुटल्यासारखी वाटते. अर्थात त्या कलाकाराने निभावलेल्या भूमिकेवर प्रेक्षकांना विश्वास बसलेला असतो त्यामुळे अचानक नव्या कलाकाराला तिथे पाहताना तो विश्वास कुठेतरी ढासळतो. नवीन कलाकाराला लगेच स्वीकारणं प्रेक्षकांना थोडसं जड जातं आणि म्हणूनच मालिका पाहण्याचा इंटरेस्ट कुठेतरी कमी होतो. स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बाबतीतही आता असंच काही घडताना दिसत आहे.
काहीच महिन्यांपूर्वी मालिकेत मुक्ताची बहीण मिहिकाची रिप्लेसमेंट करण्यात आली. ही भूमिका अगोदर मृणाली शिर्के हिने साकारलेली होती. पण अचानकपणे एक दिवस ही भूमिका अभिनेत्री अमृता बने साकारताना दिसली. सुरुवातीला अमृताला या भूमिकेत स्वीकारणं प्रेक्षकांना थोडसं जड गेलं. पण आता या मालिकेत आणखी एकाची रिप्लेसमेंट करण्यात आली आहे. सावनीचा बॉयफ्रेंड आणि मिहिकाचा नवरा हर्षवर्धनच्या भूमिकेत तुम्हाला एक वेगळाच चेहरा पाहायला मिळत आहे. हर्षवर्धनची भूमिका याअगोदर यश प्रधान याने साकारली होती. पण आता त्याने ही मालिका सोडलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी आता नाना पाटेकर यांच्या भाच्याची निवड करण्यात आली आहे. अभिनेते अनिरुद्ध हरिप हे नाना पाटेकर यांचे भाचे आहेत.
‘अब तक छप्पन’ या चित्रपटात मामा भाचे दोघेही एकत्र झळकले होते. अनिरुद्ध हरिप यांनी मराठी मालिकेतही दमदार खलनायक साकारले आहेत. लगोरी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, नवा गडी नवं राज्य अशा मालिकेत ते झळकले आहेत. आता प्रेमाची गोष्ट मालिकेत हर्षवर्धनच्या भूमिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे . यश प्रधान यांच्याशी मिळताजुळता चेहरा असल्याने आणि खलनायकी बाज असल्याने प्रेक्षकांना त्यांना या भूमिकेत पाहताना कुठे वेगळेपण जाणवलं नाही. पण जाणकार प्रेक्षकांना हे स्वीकारणं थोडसं कठीण जाणार हे नक्की. पण अनिरुद्ध हरिप त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकून घेतील असा विश्वास आहे.